110 किलोमीटरचा प्रवास करून अखेर सिद्धेश्वरचे पाणी गोदावरी पात्रात

42

सामना प्रतिनिधी, नांदेड

110 किलोमीटरचा खडतर प्रवास करुन तसेच रस्त्यातील अनेक अडथळ्यांना पार करत सिद्धेश्वरचे पाणी गोदावरी पात्रात पोहोचले. पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने प्रचंड यंत्रणा राबवूनही वेगवेगळ्या युक्त्या करून अनेक शेतकऱ्यांनी हे पाणी आपल्या शेतात, विहिरीत पळविले. मनपा प्रशासन आणि जलसंपदा प्रशासनाने या प्रकरणी 34 मोटारी, वेगवेगळे विद्युत साहित्य आणि पाईप जप्त केले आहेत. 15 दलघमी पाणी सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आले. मात्र हे पाणी नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात येईपर्यंत 2 दलघमी पाणी येऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.

विष्णूपुरी प्रकल्प मृत साठ्याकडे वाटचाल करीत असताना नांदेडकरांच्या तोंडचे पाणी पळाले. पालकमंत्री रामदास कदम यांनी तीन आठवड्यापूर्वी घेतलेल्या बैठकीत सिद्धेश्वर प्रकल्पाचे पाणी नांदेडला सोडण्याबाबत प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले. अखेर त्याला यश आले. 47 अंश डिग्री तापमान त्यातच कोरडेठक पडलेले गोदावरीचे पात्र सिद्धेश्वरवरुन आणता येणारे पाणी ज्या कालव्यातून येणार होते तोही कोरडठक. यामुळे जमिनीत पाणी बरेच मुरुन गेले. त्यातच वेगवेगळ्या कालव्याव्दारे नागरिकांनी या मार्गावर रात्री बेरात्री मोटारी लावून पाणी ओढून घेतले. 11 जून रोजी हे पाणी सकाळी सिद्धेश्वरहून सोडण्यात आले. ते आज गोदावरी नदीपात्रात पोहंचले.

विष्णूपुरी जलाशय कोरडे पडल्याने मागील पंधरा दिवसांपासून प्रकल्पाच्या मृत साठ्यातून शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. मृत साठ्यातील पाण्याचा उपसा करण्यात येत असल्याने भविष्यात नांदेडकरांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने सिद्धेश्वरचे पाणी नांदेड येथील विष्णूपुरी प्रकल्पात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. 11 जून रोजी सिद्धेश्वर धरणातून नांदेडकडे पाणी सोडण्यात आले. पाण्याची चोरी होवू नये यासाठी हे पाणी कॅनॉलद्वारे 123 क्युसेस वेगाने सोडण्यात आले. या पाण्याच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. सिद्धेश्वर धरणातून नांदेडसाठी पिण्यासाठी सोडलेल्या पाण्याचा उपसा प्रतिबंध करण्यासाठी अधीक्षक अभियंता सबिनवार, कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, कार्यकारी अभियंता बिराजदार, उपअभियंता भालेराव, उपअभियंता मुलंगे, शाखा अधिकारी मेड, पोपळे हे तळ ठोकून होते. तर दुसरीकडे शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचे पथक तैनात होते. आज सकाळी पाणीपुरवठ्यासाठी कोटीतिर्थ पंपगृहात सहा पंप सुरु करण्यात आले. त्याचबरोबर भविष्यात विष्णूपुरी प्रकल्पाची पाणी पातळी वाढावी यासाठी गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले असून, तहसीलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाळ उपसण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

दुसरीकडे सिद्धेश्वर धरणातून येणारे पाणी कडेकोट बंदोबस्तात गोदावरी नदीपात्रात पोहचविण्यात येत असून, या पाण्याच्या मार्गावरील 34 मोटारी आणि विद्युत साहित्य जप्त करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या पाण्याच्या सुरक्षिततेची पाहणी केली. जलसंपदा विभाग, महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या अथक प्रयत्नाने सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेले पाणी कॅनॉलमार्गाने आज गोदावरी नदीपात्रात आले. प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावला असला तरी पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी देखील करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी विद्युत पंपाच्या साहाय्याने आपल्या विहिरीमध्ये पाणी सोडले. सिद्धेश्वर धरणातील पाणी गोदावरी नदीपात्रात पोहोचले असल्यामुळे नांदेडकरांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 15 दलघमी सोडण्यात आलेले पाणी विष्णूपुरी प्रकल्पात 2 दलघमी पोहोचण्याची शक्यता असून या पाण्यामुळे पुढील एक महिन्यापर्यंत नांदेडकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या