
लातूर-नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रा पाटी दरम्यान उसाच्या ट्रॅक्टरला भरधाव वेगातील कारने पाठीमागून धडक दिल्यामुळे कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. हे चारही तरूण तुळजापुरला देवदर्शनासाठी निघाले होते. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (ता.३) पहाटे साडेतीन वाजता घडली आहे.
नांदेड येथील पाच तरूण त्यांच्या कारमधून लातूरमार्गे तुळजापूरकडे निघाले होते. लातूर- नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रापाटीच्या दरम्यान शेतकऱ्यांचा ऊस लातूरच्या कारखान्याकडे घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून कारने जोराची धडक दिली.कारच्या धडकेनंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी इतर तिघांना लातूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
कारमधील शिवराम हरिश्चंद्र लंकाढाई (वय 26) रा. किल्लारोड नांदेड, मोनु बालाजी कोतवाल (वय 27), नरमण राजाराम कात्रे (वय 33), कृष्णा यादव रा. नांदेड यांचा अपघातात मृत्यू झाला असून शुभम किशोर लंकाढाई रा. नांदेड हे गंभीर जखमी झाले आहेत.

































































