नांदेड महानगरपालिका निवडणुकीत मिंधे गटात फुट, दक्षिण मध्ये राष्ट्रवादीसोबत तर उत्तर मध्ये एकला चलो चा नारा

>> विजय जोशी

नांदेड महानगरपालिका निवडणुकीत मिंधे गटात फूट पडली आहे. मिंध्यांनी नांदेड दक्षिण मतदार संघात राष्ट्रवादीसोबत युती केली तर नांदेड उत्तर मध्ये बालाजी कल्याणकर यांनी एकला चलो चा नारा दिला आहे. नांदेडमध्ये आमदार हेमंत पाटील आणि बालाजी कल्याणकर यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याने या मतभेदांतूनच ही दक्षिण व उत्तर मध्ये वेगवेगळे निर्णय झाले आहेत.

नांदेड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून 2 जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवार प्रचारकार्याला लागले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मिंधे गटाने नांदेड दक्षिणमध्ये घरोबा केला असला तरी नांदेड उत्तरमध्ये मात्र एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहेत. तशी रितसर घोषणाच शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

नांदेड दक्षिणमध्ये मिंध्यांनी प्रभाग क्रमांक 1418 राष्ट्रवादीला सोडले असून, प्रभाग क्रमांक 16, 17, 1920 मध्ये काही जागी शिंदे गट तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निवडणूक लढवतील. याशिवाय काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. नांदेड दक्षिण व उत्तर अशा एकूण शहरात 50 जागा राष्ट्रवादी लढत आहे. तर नांदेड दक्षिणमध्ये 16 जागी राष्ट्रवादी काँग्रेस व 17 जागी मिंधे गटाचे उमेदवार रिंगणात तर उत्तरेत 48 पैकी 40 जागांवर आमदार कल्याणकर गट पैकी दोन उमेदवार भाजपने पळवले त्या ठिकाणी पुरस्कृत केले गद्दार आमदार कल्याणकर याना एकाकी पाडण्यात आले आहे. दोन्ही मतदारसंघ एकाच शहरात असताना वेगवेगळे निर्णय झाल्याने हेमंत पाटील-कल्याणकर यांच्यातील मतभेद व सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. या निर्णयामुळे दक्षिणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व मिंधे गटाचे नेते प्रचारासाठी गळ्यात गळा घालणार असून, उत्तरमध्ये मात्र एकमेकांच्या विरोधात प्रचार करतील.