
सामना ऑनलाईन । अर्धापूर
नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगांव पाटीजवळ शिवशाही बसचा आज सकाळी 6 वाजता अपघात झाला. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जुलै 2019 रोजी अंदाजे 5.45 च्या सुमारास पिंपळगाव फाटा (दशमेश हॉटेल)समोर बस शिवशाही क्र-एमएच 06 बीडब्ल्यू 0813 नागपूर ते नांदेड या बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर बस ही दिशादर्शक फलकाला धडकली. बसमधील प्रवाशी नामे रामा कृष्णराव ढोरे रा. यवतमाळ, नामदेव यशवंतराव कावळे रा. नागपूर, श्याम कृष्णराव ढोरे रा.यवतमाळ, कैलास शेळके रा.चिंचोली जि. यवतमाळ हे जखमी झाल्याने त्यांना म.सु.प. नांदेडच्या रुग्णवाहिकेत गणेश लोसरवार, दीपक जाधव, कपिल राठोड यांनी सरकारी दवाखाना विष्णुपुरी येथे पुढील उपचारा कामी दाखल केले.






























































