
विधानसभेच्या सुरू अधिवेशनात दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेत दलित वस्त्यांमध्ये वाढलेल्या अर्बन नक्षलवादावर आमदार हेमंत पाटील यांनी टीका करून वादाला तोंड फोडले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
अर्बन नक्षलवाद दलित वस्त्यांमध्ये वाढला आहे. याचा उल्लेख करताना आ. हेमंत पाटील यांनी बोंढार जिल्हा नांदेड येथे झालेला अक्षय भालेराव यांचा खून आणि परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत झालेला मृत्यू याबाबत बोलताना सवर्ण मंडळीवर खोटे अॅट्रासिटीचे गुन्हे दाखल होतात. आपल्यावर देखील डॉ. वाकोडे यांनी अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. अर्बन नक्षलवाद दलित वस्त्यांमध्ये वाढत आहे. त्याला आवर घालावा, अशी मागणी विधानपरिषदेत आ. हेमंत पाटील यांनी केली होती. आ. हेमंत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर आ. हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो आंदोलन’ करून हेमंत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अक्षय बनसोडे म्हणाले की, “आ. हेमंत पाटील हे जातीयवादीच आहेत. सरड्यासारखे रंग बदलतात. बोंढार आणि परभणी येथे ज्यांचा मृत्यू झाला त्यावर भाष्य न करता यात अडकलेल्या व्यक्तींची पाठराखन करत आहे. निलंबीत झालेल्या पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांची आमदार हेमंत पाटील यांच्या शेतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट करून दिली होती. सभागृहात भालेराव व सुर्यवंशी यांच्यावरील अन्यायाबाबत न बोलता अर्बन नक्षलवाद राज्यात वाढला आहे, अशी वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी दलित समाजाला डिवचले आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो.” असे बनसोडे म्हणाले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी युवा महानगर अध्यक्ष राहुल सोनसळे, अक्षय बनसोडे, प्रशांत इंगोले, आकाश जोंधळे, विशाल एडके, कुलदिप राक्षसमारे, रितेश गुळवे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या युवा सेलचे असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते. अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.