
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड रेल्वे विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रक्कमेचा अपहार झाल्याचे उघड झाल्याने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. सुरुवातीला दीड कोटीचा हा अपहार चौकशीअंती ७७ लाखांवर आला असून, या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा पाच जणांविरुध्द सहायक वाणिज्य प्रबंधक जॉन बेन्हर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी या आरोपींना संभाजीनगर न्यायालयात हजर केले असता दि.२२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नांदेड रेल्वेस्थानकावर असलेल्या तिकीट बुकींगचे पैसे बँकेत जमा करण्याऐवजी येथील बुकींग क्लार्क गोंगाटी करुणाकर, सुनीलकुमार यडावा, मोहंमद फरीस महंमद अजाज, इम्रान मोहंमद हारुण मोहंमद व सत्यजित दास यांनी संगनमताने रेल्वे तिकीटाची विक्री केलेल्या एकूण रक्कमेपैकी ७७ लाख २६ हजार ३४३ रुपयांचा अपहार केला. सुरुवातीला हि रक्कम दिड कोटीच्या आसपास होती. परंतु सिकंदराबाद विभागाच्या अधिकाऱ्यानी सर्व अभिलेखे तपासल्यानंतर काही रक्कम बँकेत भरण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले. रेल्वेस्थानकाच्या फलाट क्र.१ वरील तिकीट बुकींग खिडकीमध्ये कार्यरत असलेल्या गोंगाटी करुणाकर यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने हा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराची माहिती कळताच मागील दोन दिवसांपासून रेल्वे विभागामध्ये खळबळ उडाली आहे. विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांच्यासह सिकंदराबाद येथील एक पथक नांदेड येथे ठाण मांडून असून, विभागातंर्गत चौकशी सुरु आहे. हा प्रकार उजेडात येताच या पाचही कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. आज या आरोपींना संभाजीनगर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.२२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान नांदेड रेल्वे विभागाच्या इतिहासात नव्हे तर दक्षिण मध्य रेल्वेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या रक्कमेचा अपहार हा पहिल्यांदाच घडला असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सदरील रक्कम जुगारामध्ये गमाविल्याची कबुली दिली असून, ही कबुली कितपत खरी, याबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहेत.































































