
नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी पहाटे 3 वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्ह असून हवामान विभागाने नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना शनिवारी सुट्टी देण्यात आली आहे.
नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहे. मात्र पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने गोदावरीची परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
कंधारमध्ये वीज कोसळून शेतकरी ठार
नांदेड जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत असून कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे वीज कोसळून तरुण शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पांडुरंग निवृत्ती कदम (वय – 47) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातून घरी येत असताना पांडुरंग कदम यांच्या अंगावर वीज कोसळली, यात ते जागीच ठार झाले.
इसापूर धरणाचे 9 दरवाजे उघडले
इसापूर धरणात पाण्याची आवक वाढल्याने 9 दरवाजे उघडण्यात येऊन मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. इसापूर धरणाच्या 9 दरवाज्यातून 15273 क्युसेक्स (432.491 क्युसेक्स ) इतका विसर्ग सुरू आहे. इसापुर धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सतर्क रहा, प्रशासनाचं आवाहन
लोहा तालुक्यातील लिंबोटीचा ऊर्ध्व मानार प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे निम्न भागातील पुरामुळे बाधित होणारी लोहा व कंधार तालुक्यातील गावे लिंबोटी, चोंडी, दगड्संगावी, मांजरे सांगवी, बोरी खु, उमरज, शेकापूर, घोडज, हणमंतवाडी, डोंगरगाव, संगमवाडी, कोल्ह्यांचीवाडी, इमामवाडी या गावातील नागरिकांनी नदीपात्रातून जाणे टाळावे व सतर्क राहवे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट