
सामना प्रतिनिधी । नांदेड
सिडको भागातील रहिवासी व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नंदकुमार गाडे यांचे 25 एप्रिल रोजी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 59 वर्षे होते.
नंदु उर्फ नंदकुमार गाडे यांनी 1996 साली शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून कार्य केले असून त्यांच्या कार्यकाळात नांदेड जिल्हा परिषद व नांदेड वाघाळा महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. सिडको भागात व नांदेड जिल्ह्य़ात शिवसेना वाढविण्यासाठी त्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात वाघाळा नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला. सिडको भागात शिवसेना सक्रिय करणे आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. नांदेड जिल्ह्यात त्यांच्या कार्यकाळात 18 जि.प.सदस्य निवडून आले होते. धडाडीचा व चिकाटीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने सिडको हडको व जिल्ह्यात शिवसैनिकात व मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार 26 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता एन. डि. 4 रामनगर या राहत्या घरापासून निघून सिडको वैकुंठ धाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





























































