नांदेडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एका दिवसात चार दुकाने फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़. एकट्या अर्धापूर शहरात एकाच रात्रीत चार दुकाने फोडण्यात आली़. तसेच दोन दुकाने फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. नांदेड शहरात तीन आणि कंधारमध्ये एका ठिकाणासह एकूण आठ चोरीच्या घटना घडल्या आहेत़. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. अर्धापूर शहरातील तामसा मार्गावर असलेले दोन दवाखाने, किराणा दुकान व कृषी सेवा केंद्र असे चार शटर तोडून जवळपास 25 हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली़. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली़. रुग्णालयातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाली आहे़. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़.

तामसा मार्गावर असलेले डॉ. गजानन कड यांच्या ‘परी रुग्णालयात तीन चोरट्यांनी शटर तोडून तिजोरीतील 15 हजार रुपये लांबवले आहेत. हा प्रकार सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर शेजारीच असलेल्या राजेश मामीडवार यांच्या अक्षय किराणा दुकान तोडून 5 हजार रुपये रोख, डॉ.शिवाजी देशमुख यांच्या कामाई मेडीकल येथील 4 हजार 300 रुपये असे तिन्ही ठिकाणी शटर तोडून रोख 25 हजारे लुटले आहेत. वसंत कदम यांच्या कृषी केंद्राचे व हनुमंत राजेगोरे यांच्या सद्गुरु अग्रो क्लिनिकचे शटर तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली होती.

शहरातील सरपंच नगर भागातील दत्त विला मधील पत्रकार नरेश दंडवते यांचे घर चोरट्यांनी भरदिवसा फोडले़. ही घटना गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली़. चोरट्यांनी यावेळी 8 तोळे सोने, 5 हजार रोख आणि चांदी असा ऐवज लूटला. गेल्या काही दिवसांपासून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़. दुचाकीवरुन आलेले चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, मोबाईल लंपास करीत आहेत़. त्याचबरोबर शस्त्राचा धाक दाखवून लुटीचे प्रकारही वाढले आहेत़. कंधार येथे महावितरणच्या कार्यालयातून चोरट्यांनी 43 हजार रुपये किमतीची 62 किलो तांब्याची तार लंपास केली़. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणाऱ्या वृद्ध आणि महिलांना चोरटे लक्ष्य करत आहेत़. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.