नांदेड जिल्हा परिषद – महाविकास आघाडीचा डंका, काँग्रेसच्या अंबुलगेकर अध्यक्ष तर शिवसेनेच्या सतपलवार उपध्याक्ष

1795
nanded-zp

नांदेड जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम ठेवत भाजला सत्तेपासून दूर ठेवत विजय मिळवला आहे. अध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या मंगाराणी अंबुलगेकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्माताई नरसा रेड्डी सतपलवार यांची आज बिनविरोध निवड झाली.

नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया करण्यासाठी पीठासीन अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली. अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून मंगाराणी अंबुलगेकर यांचे एकच नाव आल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून पद्माताई सतपलवार, बबन बारसे, समाधान जाधव, संजय बेळगे, सौ.संगीता प्रवीण मॅकलवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सुरुवातीला अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली त्यात सौ. मंगाराणी अंबुलगेकर या बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. उपाध्यक्ष पदासाठी बारसे, जाधव, बेळगे, सौ. संगीता प्रवीण मॅकलवार यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या पद्माताई सतपलवार यांचा एकमेव अर्ज राहिला. त्यानंतर त्यांचीही निवड बिनविरोध करण्यात आली. या निवडीनंतर शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोष केला.

तत्पूर्वी आज सकाळी 11 वाजल्यापासून राजकीय घडामोडी सुरू होत्या. यात पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमर राजूरकर, माजी आमदार डी.पी.सावंत, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार प्रदीप नाईक यांनी एकत्रित चर्चा केली. अध्यक्ष पदाचा उमेदवार ठरल्यानंतर ज्यांचे सदस्य जास्त त्यांना उपाध्यक्ष पद देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात शिवसेनेने बाजी मारली. पक्षश्रेष्ठींनी पद्माताई सतपलवार यांच्या उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.

खासदार हेमंत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंढे, लोकसभा संघटक डॉ. मनोज भंडारी, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, शहरप्रमुख तुलजेश यादव तसेच शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या