
नांदेड जिल्हा परिषदेत अनेक प्रकरणात थेट सीईओंना ओव्हरटेक करून कारभार करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यांच्या संदर्भाने आलेल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी पाहता त्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख या वारंवार कर्तव्यात कसूर करीत असल्याची बाब पुढे आली आहे. त्याचवेळी त्यांच्याविरुद्ध गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. निलंबन काळात नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांचे मुख्यालय परभणी जिल्हा रुग्णालय येथे राहील. या कालावधीत डॉ. देशमुख यांना सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. त्याचवेळी डॉ. संगीता देशमुख यांना हे निलंबन आदेश जोपर्यंत आहेत तोपर्यंत खासगी नोकरीही स्वीकारता येणार नाही. विशेष म्हणजे नांदेड दौऱ्यावर आलेल्या अंदाज समितीच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच हे निलंबनाचे आदेश निघाले आहेत.





























































