
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे लोककलावंतांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारने लोककलावंतांची मदत घ्यावी, अशी मागणी शाहीर नंदेश उमप यांनी केली आहे.
गेल्या वर्षभरापासून देशासह राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. काम नसल्यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील कलावंतांचे हाल झाले आहेत. आपल्या कलेतून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हे कलावंत करत असतात. कोरोनाच्या काळात हेच जनजागृती काम शासनाने या कलावंतांकडे द्यावे. त्यासाठी त्यांना योग्य मानधन द्यावे.
आकाशवाणी, दूरदर्शन, सोशल मीडिया अशा विविध ठिकाणी या कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करावा. जेणेकरून कलाही जपली जाईल आणि समाजप्रबोधन देखील होईल,असे नंदेश उमप म्हणाले.





























































