नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून 43 हजारांचा विसर्ग, गोदावरी नदीला पूर

सोमवारी दिवसभरातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरणातील विसर्ग मात्र कायम आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 43882 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून दारणा आणि गंगापूर धरणाच्या पाणलोटात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. घाटमाथा पावसाने झोडपून काढला, त्यामुळे पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणात होत आहे. दारणा धरणाच्या पाणलोटातील घोटीला 120 मिमी, इगतपुरीला 173 मिमी पावसाची नोंद झाली. भावली 149, वाकी 119, भाम 110 मिमी पावसाची नोंद झाली. दारणा धरणात काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत 1.3 टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली. दारणा धरणातून 13160 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.

दारणा समूहातील भावलीतून 948 क्युसेक, भाममधून 3252 क्युसेक, वाकीतून 363 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. हे पाणी दारणा धरणात दाखल होत होते. काल सकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 6.2 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणा समूहाच्या व्यतिरिक्त वालदेवीतून 1305 क्युसेक, आळंदीतून 687 क्युसेक, मुकणेतून 400 क्युसेक, कडवातून 3620 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, अधूनमधून जोरदार आगमन होत होते. मागील दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे गंगापूर धरणात 24 तासांत अर्धा टीएमसीहून अधिकचे पाणी दाखल झाले.