
सामना प्रतिनिधी। नांदुर्गा
औसा तालुक्यातील नांदुर्गा भाग दोन जवळील माळरानात हरीणाची शिकार करण्यात आली असून, शिकार करणाऱ्यांमध्ये एका महिलेसह सहा जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यातील पुरुष आरोपी फरार असून महिलेस सोडून देण्यात आले आहे.
माळरानात हरिणाची शिकार झाल्याचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तिथे आल्यावर पोलिसांना एक दुचाकी क्र.एम.एच.24 ए.ए.8357,हरिण पकडण्यासाठी लागणारे जाळे,तीन ते चार किलो हरिणाचे कच्चे व शिजवलेले मांस तसेच एक कपडा असे साहीत्य सापडले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून सर्व साहीत्य जप्त केले. मात्र आरोपी महीलेला अटक करण्यासाठी महीला कर्मचारी नसल्यामुळे तिला सोडून देण्यात आले असून पुढील तपास वनीकरन विभागामार्फत करण्यात येईल असे वन परीमंडळ अधिकारी गणेश सेवाळे यांनी सांगितले.


































































