दाभोलकर हत्याकांडाचे कळवा खाडी कनेक्शन; हत्येतील पिस्तूल सीबीआयच्या ताब्यात

1022

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर तब्बल सात वर्षांनी हत्याकांडाचे कनेक्शन ठाणे असल्याचे समोर आले. कळवा खाडीत हत्येत वापरलेले एक पिस्तूल सीबीआयने शोधून काढल्याचा पुरावा पुणे न्यायालयात सादर करण्यात आला आहे. खाडीत सापडलेले पिस्तूल फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे, तर दाभोलकर यांच्या शरीरावरील जखमा आणि पिस्तुलाच्या बुलेटचे मोजमाप केल्यानंतर हे पिस्तूल दाभोलकर यांच्या हत्येत वापरले होते की नाही याचा खुलासा होणार आहे.

दाभोलकर हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडे (सर्जन), वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळसकर सचिन अंदुरे अशा सात जणांचा समावेश असल्याचे समोर आले. अटक आरोपीनी हत्येत वापरलेले पिस्तूल हे खाडीत टाकल्याचे अटकेनंतर चौकशीत पोलिसांना सांगितले होते, मात्र नेमकी कुठली खाडी याबाबत संभ्रम होता. कळसकर हा पुण्याहून नालासोपाऱयाला जाताना ठाणे खाडीत हे पिस्तूल टाकल्याचे सांगितल्यामुळे सीबीआय पथक ठाण्याच्या खाडीचा शोध घेत होते. कळवा खाडीत नॉर्वेवरून आणलेल्या अद्ययावत पथकाची मदत घेऊन एक गावठी पिस्तूल शोधण्यात आले, असा दावा सीबीआयने न्यायालयात केला.

बॅलेस्टिक रिपोर्टनंतर होणार खुलासा

कळवा खाडीत सापडलेले गावठी पिस्तूल हे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत वापरलेले आहे काय, या प्रश्नाचा खुलासा फॉरेन्सिक बॅलेस्टिक रिपोर्टनंतर स्पष्ट होणार आहे. कारण नरेंद्र दाभोलकर, कुलबर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत गावठी पिस्तुलांचा वापर केला गेला. दरम्यान दाभोलकर यांच्यावर ज्या पिस्तुलातून गोळ्या चालविण्यात आल्या ते हेच पिस्तूल आहे काय याची चाचपणी करण्यात येत आहे.

  • ऑगस्ट, 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर मार्ंनग वॉकला गेलेल्या नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली होती. 2014 मध्ये हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.

आता सूत्रधारांनाही शोधून काढा!

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल सापडले असेल तर ही या प्रकरणाच्या तपासाच्या दृष्टीने फार महत्त्वाची बाब आहे. पण तपास अधिकाऱयांनी केवळ एवढय़ावरच न थांबता यामागचे जे सूत्रधार आहेत त्यांनाही शोधून काढावे अशी अपेक्षा डॉ. दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘सामना’शी बोलताना व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या