मोदींचे अग्निवीर उपाशी! भरतीसाठी आलेल्या तरुणांचे अतोनात हाल; कोणतीच सोय नसल्याने रात्र रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील पहिली ‘अग्निवीर’ लष्कर भरती संभाजीनगरमध्ये सुरू झाली आहे. या भरतीसाठी राज्यातून हजारो तरुण शहरात दाखल झाले आहेत, मात्र कोणतीही सोय नसल्यामुळे या तरुणांचे हाल झाले. राहण्या, खाण्याची परवड झाल्याने या तरुणांना उपाशीपोटी रस्त्यावरच रात्र काढावी लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘अग्निवीर’ लष्कर भरतीला शनिवारपासून संभाजीनगर येथे प्रारंभ झाला. या भरतीसाठी 76 हजार तरुणांनी नोंद केली आहे, मात्र तरुणांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे या तरुणांना रस्त्यावर आसरा घेण्याची वेळ आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील ढिंबरगल्ली, विद्युत कॉलनी, पहाडसिंगपुरा, जयसिंगपुरा आदी भागात तरुण रात्री आसरा शोधत होते. प्रचंड संख्येने तरुणांची गर्दी पाहून या भागात काही काळ भीतीचे वातावरण होते, मात्र ‘अग्निवीर’ भरतीसाठी झालेली ही गर्दी असल्याचे कळल्यावर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.