पंतप्रधान म्हणून मोदींना ‘व्हेरी गुड’ रेटिंग; महाराष्ट्रात महायुतीचेच पारडे जड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्रात महायुतीचेच पारडे जड असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत यूपीएची धुळधाण उडेल, असा अंदाज एबीपी-निल्सन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने राज्यात घेतलेल्या जनमत पाहणीच्या निकालात व्यक्त केला आहे. या कंपनीने महाराष्ट्रात केलेल्या सर्व्हेत भाजपला 20 जागांवर तर शिवसेनेला 17 जागांवर दणदणीत विजय मिळेल आणि महायुतीचाच डंका वाजेल असे म्हटले आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याच नावावर तब्बल 70 टक्के जनतेने शिक्कामोर्तब केले असून त्यापाठोपाठ काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पसंती दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाजूने केवळ 5 टक्के जनतेने कौल दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीला व्हेरी गुड रेटिंग देण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी चांगली असल्याचे मतदारांनी म्हटले आहे. यंदाच्या निवडणुकीत 90 टक्के मतदार त्यांच्या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार नसेल तर महायुतीच्या वतीने उभ्या असलेल्या शिवसेनेच्याच उमेदवाराला मत देईल तर 85 टक्के मतदार हा त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नसेल तर महायुतीच्या वतीने रिंगणात असलेल्या भाजपच्या उमेदवाला मत देईल, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

या समस्या भेडसावताहेत
मतदारांनी प्रामुख्याने बेरोजगारी, भ्रष्टाचार, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आणि महागाई या समस्या भेडसावत असल्याचे बहुसंख्य मतदारांनी सांगितले. दरम्यान, सत्तेवर येणाऱ्यांकडून देशातील बेरोजगारी हटवावी आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली.

प्रियंका गांधींचा प्रभाव नाही
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यंदाच्या निवडणुकीत सक्रीय झाल्यापासून त्यांचा मतदारांवरील प्रभाव आणखी वाढल्याचे बोलले जात आहे. आजी इंदिरा गांधींप्रमाणे त्यांची जादू चालेल असे म्हटले जात आहे. परंतु प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असतील तर त्यांना मत देण्याचा विचार नसल्याचे निम्म्याहून अधिक जनतेने सांगितले.
एखाद्या अभिनेत्याला मत देण्यापेक्षा राजकीय नेत्याला मत देण्याला 78 टक्के जनतेने पसंती दिली. मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीला 3.70 गुण. मनसेच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा फायदा एनडीएला होईल. 56 टक्के मतदारांचे मत.

  • पक्ष                मतांची टक्केवारी        जागांचा अंदाज
    एनडीए                48                        37
    यूपीए                  37                        11
    व्हीबीए                 2                           0
    अपक्ष आणि अन्य    12                          0
    एकूण                100                        48
  • पक्षवार जागा
    भाजप    20
    शिवसेना  17
    काँग्रेस  05
    राष्ट्रवादी काँग्रेस  05
    अपक्ष आणि अन्य  01
    एकूण  48