मोदी आजपासून चार दिवसांच्या विदेश दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, शुक्रवारपासून चार दिवसांच्या विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींचा हा दौरा 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 पर्यंत असा राहणार आहे. या दौऱ्यात ते दोन दिवस जपानचा दौरा करणार असून दोन दिवस चीनचा दौरा करणार आहेत. विदेश मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदी पहिल्या टप्प्यात 29 आणि 30 ऑगस्टला जपानचा दौरा करणार आहे, तर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर चीनचा दौरा करणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यामुळे मोदी यांच्या जपान आणि चीन दौऱ्याला महत्त्व आले आहे. मोदी जपानची राजधानी टोकियो येथे 15 व्या हिंदुस्थान-जपान शिखर संमेलनात सहभागी होतील, तर चीनच्या तियानजीमधील एससीओ शिखर संमेलनात सहभागी होतील.

दर महिन्याला फॉरेन टूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या काही महिन्यांपासून सलग विदेश दौऱ्यावर जात आहेत. मोदींनी 10 ते 13 फेब्रुवारी फ्रान्स, अमेरिका दौरा केला होता. 11 ते 12 मार्च मॉरिशस दौरा, 3 ते 6 एप्रिल थायलंड आणि श्रीलंका दौरा, 22 ते 23 एप्रिल सौदी अरब दैरा, 15 ते 19 जून सायप्रस गणराज्य, कॅनडा आणि क्रोएशिया दौरा, 2 ते 9 जुलै घाना, त्रिनिदाद, अर्जेंटिना, ब्राझील, नामीबिया, 23 ते 26 जुलै यूके आणि मालदिव दौऱ्यावर गेले होते. आता मोदी पुन्हा एकदा जपान आणि चीन दौऱ्यावर जात आहेत.