देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोल छाप सोडली, लोकांच्या हितासाठी काम केलं; PM मोदींनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांनी आपल्या राजकीय कारकि‍र्दीमध्ये दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले. तसेच हिंदुस्थानातील आर्थिक उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांचे जनक देखील त्यांना म्हटले जाते. त्यांच्या निधनामुळे जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत मनमोहन सिंग यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. “डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने सर्वात प्रतिष्ठित नेता गमावला आहे. सामान्य पार्श्वभूमी असताना सुद्धा त्यांनी देशाचे अर्थमंत्री पदापर्यंत भरारी घेतली. फक्त अर्थमंत्रीच नव्हे तर सरकारी यंत्रणेतील अनेक महत्त्वाच्या पदांचा कारभार त्यांनी पाहीला. अनेक वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी आपलं योगदान दिलं, आपली छाप सोडली. संसदेतील त्यांचा वावर हा अभ्यासपूर्ण होता. देशाचे पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.” असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.