भ्रष्टाचार, द्वेषभावना आणि घराणेशाहीवर मात करूया! लाल किल्ल्यावरून मोदी नवे काहीच बोलले नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले. यावेळी  मोदींनी परिधान केलेल्या राजस्थानी बांधणीच्या  पगडीमुळे वर्षअखेरीस राजस्थानात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.

येत्या महिन्यात ओबीसींसाठी विश्वकर्मा जयंतीला 15 हजार कोटी रुपयांसह नवीन बळ देण्यासाठी विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणाही मोदी यांनी केली.

गावांमध्ये राहणाऱ्या दोन कोटी भगिनींना लखपती बनवण्याचे आपले स्वप्न आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या तीन गोष्टींविरुद्ध आपल्याला लढायचे असून सर्व शक्तीनिशी तो लढा सुरू राहील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला दिले. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी या तीन प्रवृत्तींवर जोरदार प्रहार केला. त्यांच्यापासून हिंदुस्थानला मुक्ती मिळवायची आहे असे ते म्हणाले.

नवी दिल्लीतील राजपथावर स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अडीच तास चालला. पंतप्रधान मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना केलेल्या 90 मिनिटांच्या भाषणात मणिपूरसह देशातील भ्रष्टाचार, घराणेशाही अशा अनेक विषयांना हात घातला. भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाने देशाला डाग लावला आहे तर कुटुंबवादाने आपला देश हिरावून घेतला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या धोरणाने देश पोखरून टाकला आहे, असे सांगत कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रभारी केवळ एकाच कुटुंबाचा कसा असू शकतो, असा सवालही मोदी यांनी उपस्थित केला. कुटुंबाने, कुटुंबाचा, कुटुंबासाठी काढलेला पक्ष असाच काहींचा जीवनमंत्र आहे, अशा शब्दांत त्यांनी घराणेशाहीवर टीका केली. तुष्टीकरणाच्या राजकारणाने सामाजिक न्यायाची हत्या केली असल्याचेही ते म्हणाले. देशाला विकास हवा आहे. विकसित हिंदुस्थानचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार सहन करू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

आजचा हिंदुस्थान थांबत नाही, थकत नाही, हरत नाही

आपले सरकार वेळेपूर्वीच लक्ष्य पूर्ण करते असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसद भवनाचे श्रेयही घेतले. नवीन संसद भवन उभारण्याची चर्चा गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू होती; पण आमच्या सरकारने ते करुन दाखवले असे सांगतानाच, आजचा हिंदुस्थान थांबत नाही, थकत नाही, हरत नाही असे मोदी म्हणाले. संपूर्ण जगाला महागाईने व्यापले आहे पण हिंदुस्थानने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, असा दावाही मोदी यांनी यावेळी केला.

जग म्हातारे होतेय, हिंदुस्थान तरुण होतोय

जगातील देश वयोवृद्ध होत चालले आहेत पण हिंदुस्थान तरूण होतोय, असे सांगतानाच मोदी म्हणाले की, आपल्याकडे लोकसंख्येबरोबरच लोकशाही आणि विविधता आहे. आज घेतलेल्या निर्णयाने देशाचे भविष्य निश्चित होईल. हे सामर्थ्य देशाचे भाग्य बदलेल, आता थांबायचे नाही.

चुनो चुनौती सीना तान, जग मे बढाओ देश का नाम

पंतप्रधान मोदी यांनी एका काव्यपंक्तीने आपल्या भाषणाचा समारोप केला. ’चलता-चलाता काल चक्र, अमृत काल का भाल चक्र, सबके सपने अपने सपने, पनपे सपने सारे, धीर चले वीर चले, चले युवा हमारे, नीति सही रीति नई, गति सही राह नई, चुनो चुनौती सीना तान, जग में बढ़ाओ देश का नाम.’ असे ते म्हणाले.

तिरंग्याला साक्षी ठेवून दिला दहा वर्षांचा हिशेब; पाच वर्षांत साडेतेरा कोटी लोकांना गरिबीतून मुक्ती

भ्रष्टाचाराने देश कोंडून ठेवला होता. जागतिक अर्थव्यवस्थेत हिंदुस्थान 2014 मध्ये दहाव्या क्रमांकावर होता. तो आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. तिरंग्याला साक्षी ठेवून मी दहा वर्षांचा हिशेब देतोय, असे सांगतानाच मोदी म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारला 30 लाख कोटी मिळायचे. ते आम्ही वाढवून 100 लाख कोटींवर नेले आहेत. स्थानिक विकासासाठी 70 हजार कोटी दिले जायचे. ते 3 लाख कोटींवर नेले आहे. आज गरीबांच्या घरांवर सरकार चौपट पैसे खर्च करत आहे. गरीबांच्या घरनिर्मितीसाठी 90 हजार कोटी खर्च व्हायचे. आता 4 लाख कोटी खर्च होतात. गेल्या साडेपाच वर्षात साडेतेरा कोटी लोक गरिबीतून बाहेर आले.’

पुढील एक हजार वर्षांच्या इतिहासावर भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात इतिहासाचा दाखला देत पुढील एक हजार वर्षांच्या इतिहासावर भाष्य केले. हजार-बाराशे वर्षांपूर्वी हिंदुस्थानात एका लहान राज्यातील राजाचा पराभव झाला. ती घटना त्यावेळी छोटीशी वाटली. पण त्यानंतर हिंदुस्थान हजारो वर्षांच्या गुलामीत ढकलला गेला. पुढील अनेक वर्षे जो येईल तो हिंदुस्थानला लुटत राहिला, असे मोदी म्हणाले. ’हिंदुस्थानच्या अमृतकाळाचे हे पहिले वर्ष असून या काळात आपण जी पावले टाकू, आपण जे त्याग करू, जी तपश्चर्या करू त्यातून येत्या एक हजार वर्षांचा देशाचा सुवर्ण इतिहास अंकुरणार आहे.’ असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

सरन्यायाधीशांनी केले हात जोडून अभिवादन

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मातृभाषेतील अभ्यासाचा उल्लेख केला. देशात आम्ही मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला आहे, असे ते म्हणाले. मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेता येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतानाच, आता सर्वोच्च न्यायालयाचा निकालही स्थानिक भाषेत उपलब्ध असेल असे ते म्हणाले. ते उद्गार ऐकताच सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी मोदींकडे पाहत हात जोडून अभिवादन केले.

पुढच्या 15 ऑगस्टला पुन्हा येईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या 15 ऑगस्टलाही लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यासाठी आपण परत येऊ असा विश्वास यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले की, 2014 मध्ये मी बदल घडवून आणण्याचे वचन दिले होते. तुम्ही देशवासीयांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 2019 मधील कामगिरीच्या जोरावर तुम्ही मला पुन्हा आशीर्वाद दिलात. मी फक्त तुमच्यासाठी जगतो. कारण तुम्ही माझे कुटुंब आहात.

मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मणिपूरचा धगधगता मुद्दा उपस्थित करून तेथील लोकांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचाही प्रयत्न केला. ‘मागील काही आठवडय़ांमध्ये मणिपूर आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. त्यात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. माता-भगिनींच्या सन्मानाला कलंक लागला. मात्र, तिथे आता शांतता प्रस्थापित होत आहे. देश मणिपूरमधील नागरिकांबरोबर आहे. मणिपूरमधील लोकांनी हे शांततेचे पर्व पुढे न्यावे. शांततेतूनच या प्रश्नावर मार्ग निघेल. राज्य आणि केंद्र सरकार त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भरपूर प्रयत्न करत आहे आणि करत राहील, असे मोदी म्हणाले.

मोदींचे  शेवटचे ध्वजारोहण – लालू प्रसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरील यंदाचे शेवटचे ध्वजारोहण आहे.  असे आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.  पुढच्या वेळी इंडिया आघाडीचाच  नेता लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करेल असा दावाही त्यांनी केला आहे.