तेल तापलं, गॅस संकट गडद झालं…पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना फोन, 8 दिवसात दुसऱ्यांदा फोनवरून चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. युद्ध सुरू झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील हे दुसरे संभाषण आहे. विशेषतः हार्मुझच्या सामुद्रधुनीत वाढता तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीवर होणारा परिणाम यावर दोन्ही नेत्यांमध्ये खलबते झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी समुद्री व्यापार मार्ग सुरक्षित ठेवण्यावर आणि प्रादेशिक स्थिरतेवर भर दिला.

इराण, इस्रायल आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धाचे चटके हिंदुस्थानी नागरिकांनाही बसत आहेत. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धामुळे तेल आणि गॅस संकट गडद झाले आहे. इराणने हार्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने अमेरिकेने आपल्या युद्धनौका आखातात पाठवल्या आहेत. यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे. अशातच पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्रपतींना फोन केला. स्वत: मोदींनी एक्स पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

वारंवार सांगूनही ऐकलं नाही! कतारने अमेरिकेसह ट्रम्प प्रशासनाला सुनावले खडे बोल; गॅस प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे संतापाचा स्फोट

मोदींनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांना ईद आणि नौरोज सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. हे सण पश्चिम आशियात शांतता, स्थिरता आणि समृद्धी घेऊन येतील, अशी आशाही मोदींनी यावेळी व्यक्त केली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होत असलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. अशा हल्ल्यांमुळे प्रादेशिक अस्थिरता निर्माण होते आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींनी जागतिक व्यापारासाठी समुद्री मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर जोर दिला. जहाजांच्या मुक्त वाहतुकीचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे मोदींनी यावेळी नमूद केले. मालाची आणि ऊर्जेची अर्थात तेल व गॅस विनाव्यत्यय वाहतूक होणे ही हिंदुस्थानची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

दरम्यान, मध्य पूर्वेत घमासान संघर्ष सुरू झाल्यापासून मोदी आणि पेझेश्कियान यांच्यातील ही दुसरी चर्चा आहे. तसेच हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे देखील इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संपर्कात असून व्यापारी जहाजांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने चर्चा करत आहेत.

Israel Iran War – युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्चे तेल आणण्याची तयारी; आखाती देशात हिंदुस्थानने सात जहाजे पाठवली