
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत रेकॉर्डब्रेक विजयश्री मिळविल्यानंतर ‘एनडीए’ने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. उद्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता राजधानीत ‘एनडीए’ची महत्त्वपूर्ण बैठक होत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला खास उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ‘एनडीए’चे सर्व नवनियुक्त खासदारही हजर राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एनडीए’ प्रमुखपदी निवड केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एनडीए’तील नेत्यांच्या बैठकीत संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ यादीवर निर्णय घेतला जाईल. नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असेही सांगण्यात आले.
2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह महाआघाडीचे पानिपतच झाले. तब्बल 350 जागा जिंकून राष्ट्रीय लोकशाही आघाडी, अर्थात ‘एनडीए’ने निर्विवाद बहुमत मिळविले. एकीकडे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या गोटात सन्नाटा असताना भाजप आणि मित्रपक्षांच्या तंबूत मात्र आनंदाचे वातावरण आहे. 17 वी लोकसभा 3 जूनपूर्वी अस्तित्वात येणे गरजेचे आहे. सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींकडे केली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. राजधानीतील निवडणुकीचे वारे आता पुरते थंडावले आहे आणि सत्ता स्थापनेचे वारे वाहू लागले आहे. त्यासाठीच ‘एनडीए’ची बैठक उद्या येथे होत आहे.
आडवाणी-जोशी यांचे आशीर्वाद
नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनीही आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. आडवाणी यांनी अनेक दशके मेहनत करूनच भाजपचा पाया रचला आणि त्यावर आज ही रेकॉर्डब्रेक इमारत उभी आहे अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तर जोशी यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान फार मोठे असून माझ्यासह सर्व भाजप कार्यकर्त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाची सातत्याने गरज लागेल असे ते म्हणाले.
ट्रम्प, जिनपिंग यांना आमंत्रण
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना निमंत्रण दिले जाणार आहे. शिवाय रशिया, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि सार्क देशांच्या नेत्यांनाही या सोहळय़ासाठी खास आमंत्रित केले जाणार आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळावे यासाठी हिंदुस्थान प्रयत्नशील असून शपथविधी सोहळय़ाचे निमंत्रण ही त्याचीच रणनीती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सत्ता स्थापनेचा दावा
‘एनडीए’च्या बैठकीपूर्वी भाजपने आपल्या संसदीय दलाची बैठकही बोलावली आहे. नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर सर्वजण राष्ट्रपतींची भेट घेतील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. पंतप्रधानांसह नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी 30 मे रोजी शपथविधी सोहळा होईल असे सांगण्यात आले.
सेन्सेक्स उसळला
एकीकडे नवी दिल्लीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच मुंबई शेअर बाजारातही आज आनंदाचे वातावरण होते. दुपारपर्यंत सेन्सेक्सने 623 अंकांची उसळली घेतली आणि 39,435 पर्यंत स्थिरावला तर निफ्टी 187 अंकांसह 11,844 वर थांबला. नवे सरकार व्यावसायिक आणि उद्योजकांचे भले करणारे असेल, असा आशावाद गुंतवणूकदारांनी व्यक्त केला आहे.
अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंना दूरध्वनी
‘एनडीए’च्या बैठकीसाठी आपण आवर्जून उपस्थित राहावे, असा खास दूरध्वनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला. उद्धव ठाकरे यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि उद्या बैठकीस हजर राहू, असे आश्वस्त केले. उद्धव ठाकरे उद्या नवी दिल्लीला रवाना होणार आहेत.
ट्रम्प, जिनपिंग यांना आमंत्रण
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना निमंत्रण दिले जाणार आहे. शिवाय रशिया, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि सार्क देशांच्या नेत्यांनाही या सोहळय़ासाठी खास आमंत्रित केले जाणार आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळावे यासाठी हिंदुस्थान प्रयत्नशील असून शपथविधी सोहळय़ाचे निमंत्रण ही त्याचीच रणनीती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
मंत्रिमंडळात कोण राहणार? कोण येणार?
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याची चर्चा तर राजधानीत सुरू आहेच, पण याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. काही जुने चेहरे कायम ठेवून मोदी नव्या चेहऱयांना संधी देतील अशी अटकळ आहे.
– भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे गृह, अर्थ, परराष्ट्र किंवा संरक्षण यापैकीं एक महत्त्वपूर्ण खाते सोपविले जाऊ शकते.
– अरुण जेटली आणि सुषमा स्वराज प्रकृतिअस्वास्थ्यामुळे मंत्रिमंडळात नसतील. अर्थात याबाबत या दोघांनीही कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
– राहुल यांचा पराभव करणाऱया स्मृती इराणी यांना कॅबिनेट मंत्रीपदाची बक्षिसी मिळू शकते.
– हरदीप पुरी, अल्फोन्स आणि मनोज सिन्हा यांच्या जागी कोण?
– पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणालाही प्रतिनिधित्व मिळू शकते.
– राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद, नरेंद्रसिंह तोमर, प्रकाश जावडेकर हे चेहरे कायम राहतील.
– नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शुक्रवारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.




























































