निवडणूक आयोगाचे प्रमुख वाघमारे आहेत; त्यांनी नावाला जागावे आणि भाजपच्या लांडग्यांना आवरावं! – संजय राऊत

महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. तब्बल 8 वर्षानंतर होत असलेली ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचाराला येणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी 11 जानेवारीला मुंबईत येणार असल्याचे सांगितले. यासाठी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावरून संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयुक्तांवरही निशाणा साधला. ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.

भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी येणार असल्याबाबत माध्यमांनी विचारले असता संजय राऊत म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने राष्ट्रपतींना आणले तरी आश्चर्य वाटणार नाही. परदेशातून मोदींना कुणी मिठ्या मारणारे लोक आले तरी आश्चर्य वाटणार नाही

ते पुढे म्हणाले की, ही भाजपची परंपरा झाली आहे. राज्याराज्याचे मुख्यमंत्री, मंत्री प्रचाराला आणले जातात. माझ्या माहितीप्रमाणे 11 तारखेला मोदी मुंबईत येत आहेत. मुंबईतील जैन समाजाने एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि पंतप्रधानांनी ते आमंत्रण स्वीकारले आहे. ते प्रचारासाठीच येत आहेत ना? भाजपला मतदान करा म्हणून त्या पंथाच्या, धर्माच्या लोकांना प्रभावाखाली घेण्यासाठीच येत आहेत. निवडणूक काय डुलक्या मारतोय? या राज्याच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख वाघमारे आहेत. त्यांनी नावाला जागावे आणि भाजपच्या लांडग्यांना आवरावे, असे राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांना राज ठाकरे मंगळवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी आल्याबाबत विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, मातोश्रीवर राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. मुंबई, नाशिक, कल्याण-डोंबिवली, ठाणे येथे संयुक्त सभा कधी आणि कशाप्रकारे घ्यायच्या याच्यावर काल चर्चा झाली. त्यात लपवण्यासारखे काही नाही. तसेच संयुक्त जाहीरनाम्याचे प्रकाशना संदर्भात चर्चा झाली.

तुमची निष्ठा तिकिटावर की पैशावर? त्यांना लगेच दुसऱ्या पक्षात तिकीट कसं मिळतं? – संजय राऊत

ते पुढे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्या, जिंकून याव्यात अशी आमची इच्छा, भावना आहे. कारण मनसेने उत्तम जागा जिंकल्या, तर शिवसेनेने जिंकलेल्या जागांना किंमत आहे. तरच आम्ही बहुमताचा आकडा पार करू शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पक्षाने त्यांना मिळालेल्या जागांपैकी 80 टक्के जागा जिंकाव्यात आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करू.

शिवसेना-मनसे युतीचे शिलेदार मैदानात; मुंबईत 227 जागांसाठी तीन हजार उमेदवार रिंगणात, 3 जानेवारीला लढतींचे चित्र स्पष्ट होणार