
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित नारी सन्मान सोहळ्याला बचत गटाच्या हजारो महिलांनी उपस्थिती लावत आज हिंगोलीमध्ये मातृशक्तीचा प्रत्यय दिला. माविमच्या अध्यक्षा व शिवसेनेच्या महिला आघाडी संपर्क संघटक ज्योती ठाकरे यांच्या हाकेला प्रतिसाद देत जमलेल्या बचत गटांपैकी उत्कृष्ट बचत गटातील महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. तसेच माविमच्या नुतन इमारतीचे उद्घाटनही संपन्न झाले. यासोबतच बंजारा महिला बचत गट व अन्य गटांना कृषी अवजारे व साहित्याचे वाटपही माविमच्या वतीने करण्यात आले.
हिंगोली येथे औंढा रस्त्यावर महिला आर्थिक विकास महामंडळाचे नूतन सुसज्ज कार्यालय व इमारत बांधण्यात आली असुन, या इमारतीचे उद्घाटन माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महिला बचत गटांना कृषी साहित्य व अवजारांचे वितरण देखील मान्यवरांनी केले. या कार्यक्रमाला ज्योती ठाकरे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा शिवरानी नरवाडे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, आमदार रामराव वडकुते, पोलिस अधिक्षक योगेशकुमार, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय लोखंडे आदींची उपस्थिती होती. तसेच माविमच्या वतीने रामलीला मैदानावर भव्यदिव्य नारी सन्मान सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमात नांदेड, हिंगोली, परभणी या तिन जिल्ह्यातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ज्योती ठाकरे यांचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, सहसंपर्कप्रमुख डॉ.रमेश शिंदे, राजेंद्र शिखरे, जिल्हा युवा अधिकारी बाजीराव संवडकर, दिलीप घुगे, जिल्हा संघटक उद्धवराव गायकवाड यांनी सत्कार केला. या नारी सन्मान सोहळ्याला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड, आमदार तान्हाजी मुटकुळे, आ.रामराव वडकुते, गोदावरी अर्बनच्या चेअरमन तथा सामाजीक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील, जि.प.अध्यक्षा शिवरानी नरवाडे, जि.प.सदस्या रूपाली पाटील गोरेगावकर, मंगला कांबळे, महिला सभापती रेणुका भानुदास जाधव, श्रध्दा जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे व रामराव वडकुते यांनी माविमने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तर माविमच्या अध्यक्षा व शिवसेनेच्या महिला संपर्क संघटीका ज्योती ठाकरे म्हणाल्या की, ग्रामीण असो की शहरी भागात महिला बचत गटाच्या माध्यमातुन कुटुंबाला आधार देण्याचे काम नारी शक्ती करत आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या हे हजारो कोटी रूपये कर्ज घेऊन देश सोडून पळाले. मात्र प्रामाणिक असलेली माझी महिला भगिनी बचत गटाचे घेतलेले कर्ज फेडत नुकत्याच झालेल्या महापुरात माविमच्या माध्यमातुन बचत गटाच्या महिलांनी प्रत्येकी 1 रूपया जमा करत 14 लाख 70 हजार 228 रूपयांची मदत पूरग्रस्तांना केल्याचेही ठाकरे यांनी सांगीतले. माविमला शासनाकडून इतर महामंडळाप्रमाणे आर्थिक मदत होत नसल्याची खंत व्यक्त करून त्यावरही मात करत बँकांशी संपर्क साधून बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे. राज्यात 2 हजार 700 कोटी रूपयांची कर्ज बँकांनी बचत गटाला दिले असुन, माविमनी या माध्यमातून स्त्री शक्तीला मदत केल्याचेही त्यांनी सांगीतले. दुष्काळ असला तरीही खंबीरपणे उभे राहुन कुटूंबाला हातभार लावा असे आवाहनही त्यांनी केले.






























































