अजब हॉटेलची गजब कहाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील महागडय़ा आणि मोठय़ा हॉटेलांविषयी आपण ऐकले असेलच. आज आपण जगातील अरुंद अशा हॉटेलविषयी जाणून घेऊ या. हे हॉटेल इंडोनेशियामध्ये आहे. मध्य जावा येथील सलाटिगा येथे स्थित हॉटेलात एकूण सात खोल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर एक खोली. आर्किटेक्ट आर्य इंद्रा यांनी ही वास्तू बनवली आहे. त्यांनी जमिनीच्या एका तुकडय़ाला सात मजली हॉटेलात रूपांतरित केले आहे, ज्याची रुंदी फक्त 2.8 मीटर आहे.

या हॉटेलाचे वैशिष्टय़ म्हणजे समोर थेट पर्वतरांगांचे दर्शन घडते. प्रत्येक खोलीत डबल बेड, शॉवर असलेले बाथरूम आणि एक शौचालय आहे. प्रत्येक खोली स्थानिक कलेने सजलेली आहे. सगळय़ात वरच्या मजल्यावर बार आणि रेस्तराँ आहे.

या अनोख्या हॉटेलच्या नावावर विक्रम व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याविषयी आर्य इंद्रा म्हणाले, ‘‘सलाटिगा शहराला एका नव्या नजरेने लोकांनी पहावे असे मला वाटते. तेथील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून स्थानिकांच्या मदतीने हा प्रोजेक्ट राबवला आहे.’’