योगी आदित्यनाथ यांच्या ‘अब्बाजान’ वाल्या विधानावर नसिरुद्दीन शहा संतापले

उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे वाहायला लागले असून तिथे सार्वजनिक सभांनाही सुरुवात झाली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगर इथे एका सभेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका करण्यासाठी अब्बाजान या शब्दाचा वापर केला. यावरून सपा, काँग्रेसने त्यांच्यावर टीकाही केली आहे. बॉलीवूड अभिनेते नसिरूद्दीन शहा यांनीही आता त्यांच्यावर टीका केली आहे.

शहा यांनी योगी आदित्यनाथ यांनी वापरलेला हा शब्द आक्षेपार्ह असल्याचं म्हटलंय. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलंय की ‘त्यांचे हे विधानखरंतर प्रतिक्रिया देण्याच्याही लायकीचं नाहीये. योगी आदित्यनाथ हे जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सर्वत्र गरळ ओकत असून हे विधान त्याचाच एक भाग आहे.’ योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना समाजवादी पक्षावर टीका केली होती. मुलायमसिंह यादव यांचे नाव न घेता ते म्हणाले की ‘अब्बाजान म्हणणाऱ्यांनी गरीबांच्या वाट्याला येणारे रेशनचं धान्यही लुटलं. त्या काळी कोणच्या तरी वाट्याचं रेशन भलत्याच्याच ताटात पडायचं. ‘ योगी आदित्यनाथ यांच्या याच विधानावरून सध्या वादंग निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या