काँग्रेस आघाडीत एक इंचही ‘राष्ट्रवाद’ नाही! -आदित्य ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्टवादी महाआघाडीच्या दहातोंडी रावणाचे दहन करण्यासाठी भाजपा-शिवसेना महायुतीला मतदान करून महाराष्ट्राला विजयी करा, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत एक इंचही ‘राष्ट्रवाद’ नसल्याचा घणाघातही त्यांनी केला.

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना उमेदवार, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रचारार्थ वडेल येथे, नांदगाव मतदारसंघातील शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारार्थ नांदगाव येथे, निफाड मतदारसंघातील शिवसेना उमेदवार आमदार अनिल कदम यांच्या प्रचारार्थ सायखेडा येथे, तर दिंडोरी मतदारसंघातील शिवसेना उमेदवार भास्कर गावीत यांच्या प्रचारार्थ दिंडोरी बाजार समितीत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गुरुवारी भव्य प्रचार सभा झाल्या.

मला नवा महाराष्ट्र घडवायचाय, जनतेची स्वप्न साकारायची आहेत. प्रत्येक शेतात ठिबक सिंचन योजना राबवायची आहे. शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुती ही लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतेय, तोच अजेंडा घेऊन निवडणूक लढतेय, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. महायुतीचे सरकार महाराष्ट्राला कर्जमुक्त, बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सुजलाम् सुफलाम्, भगवा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी महायुतीलाच विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेस कुठेच दिसत नाही

दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या हातून सत्ता गेल्याने त्यांची पोटदुखी वाढली आहे. पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी भ्रष्टाचाराशिवाय दुसरे काहीच केले नाही. पुन्हा सत्ता मिळविणेही त्यांना आता शक्य होणार नाही. ते स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडणुकीत उतरले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा महायुतीची जणू विजयी यात्राच निघत आहे, इतका जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस कुठेच दिसत नाही.

प्रत्येक जिह्यात महिला बचत गट भवन

महिला बचत गटात काम करणाऱया महिलांना स्थान देण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक जिह्यात महिला बचत गट भवन निर्माण करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.