
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या कोपरगावच्या दोन तरुणांचा तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. मिलिंद जाधव (वय – 27) व रोहित राठोड (वय – 17) अशी तरुण मृत युवकांची नावे आहेत.
कोपरगाव शहरातील सुमारे दहा ते पंधरा युवक नाशिक जिल्ह्यातील अंकाई येथील अंकाई किल्ल्यावर पर्यटनासाठी 16 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गेले होते. यावेळी मिलिंद जाधव पाय घसरून तळ्यामध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला त्याचा आतेभाऊ रोहित राठोड हा देखील तोल जाऊन तळ्यात पडला आणि दोघांचाही मृत्यू झाला.
किल्ल्यावर असलेल्या काही तरुणांनी याची माहिती अंकाई गावातील नागरिकांना दिली. यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह तळ्यातून बाहेर काढले. दोघांचे मृतदेह येवला येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आले आणि त्यानंतर रात्री कोपरगाव मृतदेह आणल्यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.



























































