
नाशिक जिल्हा रुग्णालयात शनिवारपासून उपचार सुरू असलेल्या ‘कोरोना’च्या संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. याबाबतचे कागदपत्र प्रत्यक्ष हाती आल्यानंतर या तरूणाला रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.
मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील हा तरूण शिक्षणासाठी इटलीत राहतो. काही दिवसांपूर्वी तो हिंदुस्थानात आला, त्यावेळी आरोग्य तपासणीत तो निरोगी होता. शुक्रवारी तो नाशिकमध्ये बहिणीकडे आला. त्याला सर्दीचा त्रास होवू लागल्याने शनिवारी त्याच्यावर ‘कोरोना’ संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात उपचार सुरू करण्यात आले. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे या प्रयोगशाळेने जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगितले. मात्र, याबाबतची संपूर्ण कागदपत्रे हाती आल्यानंतरच या तरूणाला घरी सोडण्यात येणार आहे.
आठजणांची तपासणी सुरू
परदेशातून आलेल्या व्यक्तींची सलग चौदा दिवस वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानुसार नाशिक व इगतपुरी तालुक्यातील प्रत्येकी तीन व मालेगाव तालुक्यातील दोन अशा आठजणांची दररोज घरी जावून तपासणी केली जात आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.























































