पालकमंत्री गिरीश महाजन यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी नाशिक जिह्यात आलेले जिह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना शेतकऱयांच्या रोषाला चांगलेच सामोरे जावे लागले. 2017 मधील गारपिटीच्या नुकसानभरपाईचे पैसे अद्याप न आल्याने संतप्त शेतकऱयांनी महाजनांना धारेवर धरल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. ‘आपले म्हणणे बरोबर आहे, मलाच माहिती नव्हती, 12 कोटी रुपये राहिले आहेत, आठवडाभरात तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होतील’, असे आश्वासन देऊन महाजनांनी वेळ मारून नेली. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज ओझर, निफाड, चांदवड, उमराणे, देवळा यासह ठिकठिकाणी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांना शेतकऱयांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

तुम्ही पालकमंत्री आहात, गारपिटीचे पैसे गेले कुठे?

निफाड तालुक्यातील ओझर येथे द्राक्ष बागाईतदार संघाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. नुकसानग्रस्त शेतकऱयांना भरीव मदत देणार असल्याचे सांगत असतानाच उपस्थित शेतकऱयांनी गिरीश महाजन यांना धारेवर धरले. सन 2017ला झालेल्या गारपिटीच्या नुकसानभरपाईचे काय झाले, एक रुपयाही अद्याप आला नाही. आमच्या जागी तुम्ही असता तर काय केले असते? तुम्ही आणि अधिकारी आम्हाला वेडे समजतात. शेतकरी म्हणजे काय समजता? तुम्ही पालकमंत्री आहात, पैसे गेले कुठे सांगा, असा सवाल शेतकऱयांनी करताच महाजनांची भंबेरी उडाली.

आपली प्रतिक्रिया द्या