
नाशिक जिल्ह्यातील मौजे रवळजी गावाच्या शिवारातील दरी भागात बिबट्याने दोन बकऱ्या व एक बोकडाचा फडशा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात दिवसा व रात्री शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे अशी अवस्था झाली आहे. वन विभागाने दरी परिसरात पिंजरा लावून या बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
कळवण तालुका हा महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवरील तालुका असून गुजरात राज्याच्या डांग जिह्यात मोठी जंगल संपत्ती शासनाचा प्रयत्नाने राखली गेली आहे. या जंगलात सर्वच प्रकारचे प्राणी आढळून येतात. यात बिबटय़ांची मोठी संख्या आहे. हे बिबटे सापुतारा, मंगलीदर, दोन मानूर या परिसरातून कळवण तालुक्यात येत असतात. त्यामुळे पुनंद खोऱ्यातील सर्वच भागात बिबट्यांची दहशत आहे. तालुक्यातील रवळजी गावाच्या दरी शिवारात कळवण वन विभाग व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने मोठे जंगल राखले गेले आहे. यामुळे येथे बिबट्यांची नेहमीच वावर आढळला आहे. 20 सप्टेंबरच्या मध्यरात्री शेतकरी दादाजी रामभाऊ पवार यांच्या गोठ्यातील दोन बकऱ्या आणि एक बोकडाचा फडशा पडला असल्यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतवस्तीत राहणाऱ्या नागरिकांना दिवसही घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. वन विभागाने दरी परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून मका, बाजरी, ऊस पिकेही वाढली आहेत. पिकांना खाद्य लावणे, पाणी देणे तर काही पिके काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतात जावेच लागते. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जाणे कठीण झाले आहे. बिबट्याच्या वावर असल्याची चर्चा झाल्याने शेतमजूरही कामावर येत नाही. मुलांना शाळेत पाठवणेही बंद केले आहे. त्यामुळे बिबट्याच्या तत्काळ बंदोबस्त करावा.

























































