नाशिकच्या माया सोनवणे, प्रियांका घोडके महाराष्ट्र क्रिकेट संघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकच्या माया सोनवणे व प्रियांका घोडके या दोघींची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र संघात त्यांची निवड झाली आहे. साखळी सामने डेहराडून येथे 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. महाराष्ट्राचा एलिट ए गटात समावेश आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी भोपाळ येथे सराव सामने होणार असून महाराष्ट्र संघाचा 20 जणांचा चमू रवाना झाला आहे.

माया हिची हंगामाच्या सुरुवातीस भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य 35 खेळाडूंमध्ये निवड झाली होती. उत्कृष्ट लेगस्पिनर माया मधल्या फळीतील भरवशाची फलंदाज देखील आहे. पुदुचेरीतील 23 वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत तिने लक्षणीय कामगिरी केली होती. 2014-15 तसेच 2018-19 च्या हंगामात 19 व 23 वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेमध्ये मायाने देशामध्ये सर्वाधिक अनुक्रमे 23 व 21 गडी बाद करण्याचा विक्रम केला. मागील हंगामात बीसीसीआयच्या प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात देखील निवड झाली होती.

प्रियांका आघाडीची फलंदाज व ऑफ स्पिनर असून तिने महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील संघाचे, तसेच नोव्हेंबर 2019 मध्ये पुदुचेरीत टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करताना फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. 2018-19 च्या हंगामात टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक बळी घेतले होते. तसेच महत्वाच्या सामन्यात अर्धशतके झळकाविली आहेत. त्यांच्या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेट विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.