चाळीस मिनिटात मुंबई -पुणे-शिर्डी, डेली हेलिकॉप्टर सेवा सुरू

1663

अमेरिकन हेलिकॉप्टर टॅक्सी सर्विस फ्लाय ब्लेड व भारतीय कंपनी हंच व्हेंचर्स यांचे संयुक्त विद्यमाने मुंबई व पुणे ते शिर्डी अशी हेलिकॉप्टर सेवा (एअर टॅक्सी सेवा) पुरविणाऱ्या कंपनीकडून आता 40 मिनिटांत साईभक्तांच्या सेवेसाठी ही सेवा शुक्रवारी सुरू करण्यात आली आहे. देशांतर्गत सीट बेसिसवर सुरू झालेली पहिली एअर टॅक्सी सेवा आहे. अशी माहिती फ्लाय ब्लेड कंपनीचे ऑपरेशन हेड कर्नल संजय दिलवारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हंच व्हेंचर्सचे फांऊडर करणपाल सिंग म्हटले की, या एअर टॅक्सी सेवेमुळे मुंबई व पुणे येथून फक्त 35 मिनिटामध्ये शिर्डी येथे पोहचता येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होईल. तसेच सीट बेसिसवर भारतात प्रथमच अशी सेवा सुरू होत असल्याने आर्थिकदृष्टया प्रवाशांना या सेवेचा मोठा लाभ होईल त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मेडिकल अत्यावश्यक सेवेसाठीही ही सेवा लाभदायक ठरणार आहे.

मुंबई येथून महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड व पुणे येथील मुंढवा हेलिपॅड व शिर्डी येथे आत्मा मालिक हेलिपॅड येथून ही सुविधा देण्यात येणार आहे. तसेच ही एअर टॅक्सी सेवा सोमवार ते शनिवार उपलब्ध असणार असून एकावेळी सहा प्रवासी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करू शकतील. या एअर टॅक्सी अंतर्गत येणा-या सर्व साई भक्तांसाठी अद्ययावत सुविधा देण्यात येणार आहे. तसेच हेलिपॅड मानांकनानुसार हेलिपॅडवर आवश्यक सर्व सुविधा व स्टाफ नेमण्यात आलेला आहे. तसेच लवकरच हौशी विद्यार्थी व नागरिकांसाठी हेलिकॉप्टरमधून ‘जॉय राईड’ ची सेवा सुरू करणार आहोत. या सेवेअंतर्गत आत्मा मालिक हेलिपॅड ते शिर्डी दर्शनाची सहा मिनिटांची एक राईड असेल. त्यामुळे हेलिकॉप्टर मध्ये बसण्याचा अनुभव व आनंद सर्वांना घेता येईल असे यावेळी त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेच्या वेळी फ्लाय ब्लेड इंडिया प्रा. लि. चे ऑपरेशन हेड कर्नल दिलवारीया, हंच व्हेंचर्सचे संस्थापक संचालक, करणपाल सिंग, अमित दत्ता या सेवेचे फॅसीलीटेटर व साई यात्री ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापकीय संचालक विजय जेजुरकर, आश्रम ट्रस्टचे विश्वस्त वसंतराव आव्हाड, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, प्राचार्य सुधाकर मलिक, बाळासाहेब आहेर आदि उपस्थित होते.

यापूर्वी साई भक्तांच्या सेवेसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे विमाननतळ करण्यात आले असून या विमानतळामुळे गेल्या दोन वर्षात पाच लाख भाविकांनी या विमान सेवेचा लाभ घेतला आहे. ही भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता लवकरच काकडी विमानतळ इंटरनॅशनल करण्याचे प्राधिकरणाचा विचाराधीन आहे. काकडी विमानतळापाठोपाठ आता कोपरगाव तालुक्यातील कोकण ठाण जंगली महाराज आश्रम आत्मा मलिक हेलिपॅड येथून शुक्रवारी सकाळपासून हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ 40 मिनिटांत आता शिर्डी वरुन मुंबई किंवा पुण्याला पोहोचता येईल.

ब्लेड इंडिया अॅपद्वारे प्रवाशांना या सेवेचे बुकींग करता येणार आहे. सध्या या प्रवासाचा दर निश्चित करण्यात आला नाही. मात्र, लवकरच याबाबत संबंधित कंपनीच्या अॅप आणि वेबसाईटवरुन भाड्यासंदर्भात माहिती देण्यात येईल. विशेष म्हणजे खासगी जेटपेक्षा या हेलिकॉप्टर भाडे खूप कमी असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. डेली हेलिकॉप्टर फेऱ्यांची सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे साई भक्तांमध्ये आनंद होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या