
नाशिक जिह्यातील विधानसभेच्या पंधरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना- भाजप महायुतीला 7 तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 7 जागांवर विजय मिळवला. मालेगाव मध्य मतदारसंघातील एका जागेवर विजय मिळवत एमआयएमने नाशिक जिह्यातील राजकारणात चंचुप्रवेश केला. धुळे जिह्यातील पाचपैकी दोन जागा भाजपला मिळाल्या असून धुळे शहर मतदार संघातील एकमेव जागा मात्र शिवसेनेला गमवावी लागली.
नाशिक जिह्यात सर्वाधिक सहा जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे. भाजपाला पाच, शिवसेनेला दोन, तर एमआयएम आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली. मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचे दादा भुसे हे 1,21,252 मते मिळवून चौथ्यांदा विजयी झाले, त्यांचे पराभूत प्रतिस्पर्धी काँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे यांना 73,568 इतकी मते मिळाली. नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा पराभव केला.
येवला मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संभाजी पवार यांना 63,726 मते मिळाली. निफाडमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप बनकर हे विजयी झाले त्यांनी शिवसेनेचे अनिल कदम यांचा पराभव केला. सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे ऍड. माणिकराव कोकाटे तर देवळालीत राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे या विजयी झाल्या. दिंडोरीत राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ विजयी झाले, कळवण मतदारसंघात राष्ट्रवादीचे नितीन पवार विजयी झाले.
भाजपाला पाच जागा
नाशिक मध्य मतदारसंघात भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी काँग्रेसच्या हेमलता पाटील यांचा पराभव केला. नाशिक पश्चिममध्ये भाजपाच्या सिमा हिरे यांचा विजय झाला. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपाचे ऍड. राहुल ढिकले, चांदवडमध्ये भाजपा डॉ. राहुल आहेर, तर सटाण्यात भाजपाचे दिलीप बोरसे विजयी झाले. मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचे दादा भुसे यांनी तर नांदगावमधून सुहास कांदे यांनी विजय मिळवला.




























































