नाशिक- ‘बॉश’मध्ये अखेर चारशे कामगारांसाठी व्हीआरएस जाहीर

नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील वाहन उद्योगातील आघाडीच्या बॉश (मायको) कंपनी व्यवस्थापनाला अखेर स्वेच्छानिवृत्तीसाठी कामगारांचे ब्रेनवॉश करण्यात यश आले आहे. कंपनीने चारशे कामगारांसाठी व्हीआरएस जाहीर केली आहे. यासाठी येत्या 1 जुलैपासून पुढील 35 दिवसात अर्ज करण्याबाबत बोर्डावर नोटीस लावण्यात आली आहे.

कोरोनामुळे कंपनी आर्थिक संकटात आल्याचे कारण पुढे करून स्वेच्छानिवृत्ती घ्यावी म्हणून व्यवस्थापन काही दिवसांपासून कामगारांचे मन वळवत होते. टेक्निकल हेड अनंत रमण यांच्याकडून कामगारांचे ब्रेनवॉश केले जात होते. यात त्यांना यश आले असून, तशी नोटीसही 25 जूनपासून बोर्डावर लावण्यात आली आहे. येथे 1,441 कायमस्वरूपी कामगार आहेत. त्यापैकी चारशे कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तरच ही योजना लागू होईल, असे निर्बंध व्यवस्थापनाने टाकले आहे. ज्यांच्या नोकरीचे दहा वर्षे पूर्ण झाले आहेत किंवा वय 40 आहे, ते या योजनेत भाग घेऊ शकतात.

या कंपनीत निवृत्तीसाठीचे वय 60 वर्षे आहे. पण, व्हीआरएसचा लाभ केवळ 58 वर्षे वयापर्यंतच्या कामगारालाच मिळेल. नियुक्तीची तारीख आणि 58 वर्षे पूर्ण वय याचा विचार करता स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणार्‍या कामगाराला 35 ते 57 लाख रूपये मिळतील. यापूर्वी निवृत्तीसाठी 60 वर्षे पूर्ण होण्याला चार महिने बाकी असतानाही स्वेच्छानिवृत्तीचा लाभ दिला जात होता. तोच निकष यापुढेही कायम ठेवावा, अशी मागणी कामगारांमधून होत आहे. त्याचबरोबर व्यवस्थापनाने स्वेच्छानिवृत्तीनंतर संबंधित कामगारांच्या मुलांना भविष्यातील नोकरभरतीत सामावून घेण्याबाबत कुठलेच ठोस आश्वासन दिलेले नाही, त्याबाबत चर्चा सुरू आहे.

हे आहेत फायदे
या कामगारांना निवृत्तीच्या वयापर्यंत 25 लाखांचा टर्म इन्शूरन्स दिला जाईल. पती-पत्नीला तीन वर्षांसाठी प्रतिवर्षी तीन लाखांचे मेडिक्लेम असेल. व्हीआरएसची रक्कम एकदम घ्यायची नसेल आणि आयकरात सूट हवी असेल तर 48 महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ही रक्कम घेता येऊ शकेल, असे जाहीर करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या