नाशिक जिल्ह्यात श्रावणसरींचा वर्षाव; इगतपुरीसह पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस

773

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून सर्वदूर श्रावणसरी बरसत आहेत. पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातही पाऊस दाखल झाल्याने चार दिवसात एकूण धरणसाठा 2 हजार 824 दशलक्ष घनफूट म्हणजे 4 टक्क्यांनी वाढला आहे.

नाशिक जिल्ह्यात जूनच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जून, जुलै दोन्ही महिने पावसाविना कोरडेच गेले. आता मोठ्या प्रतिक्षेनंतर 3 ऑगस्टपासून जिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरू झाला. दोन दिवसांपासून खर्‍या अर्थाने सर्वदूर श्रावणसरी बरसत आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने चिंतेचे ढग दूर झाले. इतर तालुक्यांमध्येही दिवसभर हलक्या सरींचा वर्षाव सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही काही प्रमाणात का होईना पाऊस पडू लागला आहे.

460 मिलिमीटर नोंद
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 460 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 145 मिलिमीटर पाऊस इगतपुरीत पडला. पेठ- 77, त्र्यंबकेश्वर- 66, सुरगाणा- 63, नाशिक- 25, दिंडोरी- 17, चांदवड- 15, कळवण- 12, सिन्नर, निफाड, सटाणा प्रत्येकी 7, मालेगाव, नांदगाव, देवळा प्रत्येकी 5, तर येवला येथे 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 75 या वार्षिक सरासरीच्या तुलनेत 612 मिलिमीटर (61 टक्के) पाऊस झाला आहे.

तीन धरणे ओव्हरफ्लो
जिल्ह्यातील भावली, माणिकपुंज आणि हरणबारी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. 92 टक्के भरलेल्या दारणामधून 5 हजार 678, भावलीतून 701, नांदूरमध्यमेश्वरमधून 6 हजार 310, चणकापूरमधून 846 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

51 टक्के जलसाठा
जिल्ह्यातील 24 धरणांमध्ये 65 हजार 818 या एकूण क्षमतेच्या तुलनेत आतापर्यंत 33 हजार 684 दशलक्ष घनफूट (51 टक्के) जलसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला हा साठा 56 हजार 64 (85 टक्के) होता. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण आता 3 हजार 389 (60 टक्के) भरले आहे. तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा धरणात 18 हजार 500 क्षमतेच्या तुलनेत 9 हजार 249 (50) टक्के साठा उपलब्ध आहे.

आपली प्रतिक्रिया द्या