नाशिकमध्ये बिबट्याने लॉकडाऊन तोडला, आणखी दोन जखमी

1452

नाशिक येथे कॉलेज रोडवर बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता इंदिरा नगर परिसरातील राजसारथी गृहनिर्माण सोसायटीमध्ये बिबट्याने प्रवेश करत दोघांना जखमी केल्याचं वृत्त आहे. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

या सोसायटीत शिरण्यापूर्वी हा बिबट्या डॉ. प्रदीप पवार यांच्या सुयश हॉस्पिटलच्या जवळ दिसला होता. त्यानंतर तो एस. एस. सॉलिटेअर नावाच्या हॉटेलमध्ये फिरताना दिसला. या रुग्णालयाच्या आणि हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या फिरत असल्याची दृश्यं कैद झाली आहेत. त्यानंतर बिबट्या इंदिरा नगर परिसरातील राजसारथी सोसायटीमधील एका विंगमध्ये शिरला. तेथे बिबट्याने एका इसमावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या खाली आला आणि सोसायटीच्या आतील रस्त्यावरून पुढे जाऊन दुसऱ्या एका इसमावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही इसम जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकासह इंदिरा नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाच्या पथकाकडून संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. माणसांना घरी बसण्याचे नियम असले तरी प्राण्यांना हे नियम लागू नसल्याने ते मात्र मुक्त संचार करत आहेत. दरम्यान बिबट्याने शुक्रवारपासून तीन जणांवर हल्ला केल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या