
सामना प्रतिनिधी । नाशिक
चांदवड तालुक्यातील मतेवाडी येथे शुक्रवारी वन विभागाच्या हद्दीत पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेअंतर्गत जलसंधारणाचे काम करण्यास स्थानिक आदिवासींनी गावकऱयांना जोरदार विरोध केला. गोफण आणि गलूरने दगडफेक करीत श्रमदानाचे काम बंद पाडले. यात श्रमदान करणारे सात गावकरी जखमी झाले आहेत. आदिवासींनी सात मोटारसायकल जाळल्या आहेत. यामुळे मतेवाडी परिसरात तणाव निर्माण झाला असून, बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेसाठी जलसंधारणाच्या कामासाठी चांदवड तालुक्यातील मतेवाडी या गावाची निवड झाली आहे. शुक्रवारी तेथील गावकऱयांनी सकाळी वन विभागाच्या हद्दीत या कामासाठी श्रमदान सुरू केले. त्याला स्थानिक आदिवासींनी विरोध केला. आपल्या भागात पाणी उपलब्ध व्हावे, पाणीप्रश्न सुटावा यासाठी हे काम केले जात असल्याचे सांगून आदिवासींची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. काहीही न ऐकता आदिवासी नागरिक विरोधावर ठाम राहिले. त्यांनी श्रमदानासाठी आलेल्या गावकऱयांच्या सात मोटारसायकली जाळून टाकल्या. यानंतर दूर जाऊन गोफण आणि गलूरने दगडफेक केली, श्रमदानाचे काम बंद पाडले. जेसीबीची तोडफोड केली. दगडफेकीमध्ये भाऊराव राघो चव्हाण, जिजाबाई भाऊराव चव्हाण, सुरेखा दगू मते, संतोष बबन मते, सागर शिवाजी कावळे, मुन्ना शहा, मोटू प्रसाद आदी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मतेवाडीसह पंचक्रोशीत खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला आहे. पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेबाबत आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.
वनजमिनी जाण्याची भीती
वन विभागातील वनजमिनी स्थानिक आदिवासी कसत आहेत. तेथे जलसंधारणाचे काम झाले तर या जमिनी आपल्याला कसता येणार नाहीत अशी भीती आदिवासींना असावी.

























































