
>> क्षितिज झारापकर
‘जंगलबुक- अ ट्रेझर’ बालनाटय़ांच्या संस्कारांतून एक संपूर्ण पिढी घडविली जाते. आजच्या मुलांची आधुनिकता लक्षात घेऊन केलेलं बालनाट्य.
मराठी रंगभूमी ही संपन्न रंगभूमी आहे असं मानलं जातं. ते खरं देखील आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे नृत्य, संगीत, वक्तृत्व आणि नाट्य जोपासण्याची आपली संस्क़ृती आहे आणि ही संस्कृती जोपासली जाते ती महाराष्ट्रातल्या शाळांमधून. शाळेचं माध्यम महत्त्वाचं नाही. मी स्वतः मुंबईतल्या डॉन बॉस्को या कॉन्व्हेंट शाळेत शिकलो, पण आज व्यक्त होतो तो मराठी नाटक, सिनेमा, टी. व्ही. अणि वृत्तपत्रांतून. शाळेत असताना आम्ही नाटकांमधून कामं करायचो. फ्रेंच नाटककार मॉलिएरच्या टेमिंग ऑ द श्रू नावाच्या नाटकात एक लहानशी भूमिका केल्याचा आजही मला खूप अभिमान आहे. मराठी कलाक्षेत्रात नावाजलेले बहुसंख्य कलाकार अशाच वारशाचे भागीदार आहेत. आपली ही संस्कृतीची जोपासना इतक्या लहान वयात सुरू होते म्हणूनच आपली मराठी रंगभूमी खरोखर खूप संपन्न आहे. बालमोहनसारख्या शाळेने आज आघाडीवर असलेले अनेक मातब्बर कलाकार आपल्याला दिले. आज सुट्टय़ांच्या मौसमात पेपरमध्ये रकाने भरभरून नाट्यशिबिरांच्या जाहिराती दिसतात. या सगळ्यातून नवीन रंगकर्मी घडवले जातात. या आपल्या संस्कृतीबाबतची आस्था बालमनात रुजवण्याचा सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे बालनाट्य. सुधाताई करमरकरांनी हा पर्याय खूप परिणामकारक पद्धतीने वापरला अणि रुजवला. आज वर्षागणिक निदान पंधरा-वीस बालनाट्य तरी रंगभूमीवर येतात. पण संख्या महत्त्वाची नाही, दर्जा महत्त्वाचा असायला हवा. दर्जेदार बालनाट्य फक्त पिढी घडवतात असं नाही ती कलाकारही घडवतात. सत्तरीत अलबत्या गलबत्या या बालनाटय़ाने दिलीप प्रभावळकर आपल्याला दिले, तर नंतर ऐशीच्या दशकात बजरबट्टू मधून अतुल परचुरे मिळाले. हे सगळं अणि ही नावं इथे नमूद अशासाठी केली की हे सगळं तेव्हापासून घडतंय जेव्हा आपल्या मराठी कलाक्षेत्रात ग्लॅमर अणि पैसा दोन्ही नव्हतं. यावरून आपला समाज किती कलासक्त आहे हे कळतं.
व्यवसायासाठी वेगळं क्षेत्र निवडलेल्या व्यक्तीही पुढे जाऊन हा कलासक्तपणा सोडत नाहीत. याचं एक उदाहरण सध्या रंगभूमीवर आलेल्या एका बालनाट्यातून मिळतं. ‘जंगलबुक-अ ट्रेझर’ हे ते नाटक. एका आर्किटेक्टच्या कल्पनेतून साकारलेलं हे एक आधुनिक बाजाचं बालनाट्य आहे. हल्लीच्या बहुसंख्य बालनाट्यांपेक्षा जंगलबुक – अ ट्रेझर निश्चित वेगळं आहे. सर्वसाधारणपणे हल्ली जी बालनाट्य असतात ती टीव्हीवरच्या लोकप्रिय कार्टून कॅरेक्टर्सवर बेतलेली असतात. फार काही कथानक न बांधता एकाच प्रयोगात अशा अनेक कॅरेक्टर्सच्या नाटुकल्या सादर करण्याकडे कल असतो. पण ‘जंगलबुक – अ ट्रेझर’ मध्ये एक कथानक बांधून एक आजच्या पिढीला उपयुक्त आणि त्यांचा वाटेल असा संदेश आहे. ‘जंगलबुक – अ ट्रेझर’चा प्रयत्न समजून घ्यायला त्याच्या घडण्याचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. एक आर्किटेक्ट प्रिती दळवी चोरघे आपल्या मुलाला बालनाट्य प्रक्रियेत गुंतवतात. त्याच सुमारास त्या काही तज्ञांसोबत एका कॉन्सरवेशन प्रोजेक्टवर काम करत असतात. हा प्रोजेक्ट देवराई या विषयावर असतो. हिंदुस्थानात ठिकठिकाणी देवाच्या नावाने वनं जोपासली जातात ज्यांना देवराई म्हणतात. मनुष्याने तिथे पोहोचून आपल्या विनाशकारी प्रवृत्तीने ही वनं उध्वस्त करू नये म्हणून प्राचीन काळापासून ह्या देवराया दातकथांच्या सहाय्याने जोपासल्या गेल्या आहेत. हे काम करत असताना प्रिती चोरघे यांना या विषयावर कल्पना सुचली आणि त्यांनी ‘जंगलबुक – अ ट्रेझर’ हे बालनाट्य लिहीलं. आजच्या इकोफ्रेन्डली आणि गो ग्रीनच्या युगात ही कल्पना फारचं स्तुत्य आहे. स्वतः आर्किटेक्ट असल्याने प्रिती चोरघेंनी या नाटकाला लिखाणातचं एक दृष्यात्मक दृष्टिकोन दिलेला आहे. ते व्हिज्युअल डायमेन्शन आपल्याला प्रेक्षक म्हणून वेगळाच आनंद देतं. सार्थक चोरघे या त्यांच्या मुलाच्या बालनाट्याच्या टीमबरोबर मग प्रीती चोरघे यांनी ‘जंगलबुक – अ ट्रेझर’ची आखणी सुरू केली.
बालनाट्याला आवश्यक पात्रांची त्यात पेरणी केली. यात राक्षस पोंगा, चेटकीण लिली, पिटबुल, ग्लॅडिएटर, डॅक्युला, जलपरी, डायनासॉर, जॅकस्पॅरोसारखी लहानांना भावणारी पात्रं आली. ती साकारणारी प्रतिभा आरेकर, कृणाल जाधव, राघव कुमार, मंगेश कासेकर, सुनील वाघमारे, समीर पोळ, सतीष वर्मा, जान्हवी साळवी, अमेय ब्रीद, करण पवार, किरण भामरोस्कर, पुष्कर शिंदे, श्रेयस चव्हाण सारकी कलाकार मंडळी आली. यातली काही अत्यंत छोटी मंडळीदेखील हिरिरीने सहभाग घेताना दिसली. स्वतः दिग्दर्शक रमेश वारंग यात दोन भूमिका करतात. चांगल्याची वाईटावर मात असं स्ट्रक्चर बांधून ‘जंगलबुक – अ ट्रेझर’ उभं राहतं. यातील ब्राव्हो ही मुख्य भूमिका सार्थक चोरघे प्रचंड एनर्जीने खूप मोहकपणे सादर करतो. नाटकाचं शीर्षकगीतही तो गायला आहे.‘जंगलबुक – अ ट्रेझर’ हे खरोखर निर्मितीमूल्यांमधे भव्य नाटक आहे. याची दृष्यात्मक उभारणी मोहक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात आहे. वेशभूषेचा विशेष उल्लेख हवा कारण हे कॉस्च्युम चीप वाटत नाहीत. खूप खर्च करून ते लोभसवाणे करण्याचा प्रयत्न आपल्याला दिसतो. निर्माते मोहन चोरघे यांनी स्वतः हे कॉस्च्युम जादुगारांच्या दुनियेतल्या इल्युझन थियरीप्रमाणे रचले आहेत. नाटकातील क्लृप्त्या सार्थपणे जमलेल्या आहेत आणि त्यामुळे मजा निश्चित वाढते.
हल्ली बालनाटय़ाला मुलांपेक्षा पालकांचीच गर्दी अधिक दिसते. केवळ शाळेतील मुलांनी भरलेलं थिएटर ही किमया या नाटकाने केली आहे. किपलिंग यांचं जंगलबुक, पायरट्स ऑफ द कॅरेबियन, थोडसं हॅरी पॉटर अशा आधारांवर उभं राहात लक्ष्मी नारायण प्रॉडक्शन्स निर्मित ‘जंगलबुक – अ ट्रेझर’ हे बालनाट्य जमलेल्या बालप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतं.
- नाटक : जंगलबुक-अ ट्रेझर
- निर्मिती : लक्ष्मी नारायण प्रॉडक्शन्स
- निर्माते : मोहन चोरघे
- लेखिका, नेपथ्य, संकल्पना : प्रीती चोरघे
- संगीत : रुपेश दुदम
- गीतकार : कृष्णाज जाधव
- प्रकाश योजना : श्याम चव्हाण
- नृत्य : सुनील वाघमारे
- दिग्दर्शक : रमेश वारंग
कलाकार : प्रतिभा आरेकर, जान्हवी साळवी, मंगेश कासेकर, सुनील वाघमारे, समीर पोळ, सतीश वर्मा, अमेय ब्रीद, करण पवार, सार्थक चोरघे, रमेश वारंग - दर्जा :***

























































