नताशाची लक्ष्यभेदी कामगिरी, श्रवणक्षमता कमी असूनही नेमबाजीत जागतिक भरारी

श्रवणक्षमता कमी असूनही अंधेरी येथील नताशा उदय जोशी या 20 वर्षीय विद्यार्थिनीने नेमबाजीत जागतिक स्तरावर लक्ष्यभेदी कामगिरी केली. जर्मनीत झालेल्या वर्ल्ड डेफ चॅम्पियनशिपमध्ये तिने दुहेरी पदकाची कमाई केली. या कामगिरीबद्दल नताशावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नताशाची श्रवणक्षमता कमी होती. ती 100 टक्के ऐकू शकत नव्हती. नताशा दोन वर्षांची असताना तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तिने साधारण मुलांसारखे शिक्षण घेतले. विलेपार्ले येथील माधवराव भागवत हायस्कूलमध्ये ती शिकली. आता ती अंधेरीच्या डहाणूकर महाविद्यालयात बॅचरल ऑफ अकाऊंटिंग अॅण्ड फायनान्सिंग अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकतेय. नताशा नऊ वर्षांपासून नेमबाजीचा सराव करतेय. शालेय स्पर्धांमध्ये देशपातळीवर सर्वसाधारण गटामध्ये तिने सुवर्णपदक मिळवले. तसेच 2022 मध्ये ब्राझील येथे झालेल्या डेफ ऑलिम्पिकमध्ये चौथ्या व सातव्या स्थानावर यश मिळवले. नुकतेच जर्मनी येथे झालेल्या वर्ल्ड  डेफ चॅम्पियन्सशिपमध्ये तिने वैयक्तिक गटात ब्राँझ तर मिश्र संघात  सिल्व्हर मेडल मिळाले. नेमबाजीसोबत नताशा जलतरणपटू आणि बॅडमिंटनपटू आहे. तिने कथ्थकच्या तीन परीक्षा दिल्या आहेत. याशिवाय प्राण्यांसाठी काम करणाऱ्या एनजीओसोबत काम करते.