अग्रणी नदी पुनरुज्जीवन उपक्रमाला राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदी पुनरुज्जीवन उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे जल क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी वर्ष 2019 चे नदी पुनरुज्जीवन विभागात राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी पश्चिम विभागातून सांगली जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय जल संसाधन, नदी विकास राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या उपस्थितीत ऑनलाइन प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे सांगली जिह्याच्या नावलौकिकात भर पडल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तामखडी या गावामध्ये अग्रणी नदी उगम पावते. ही नदी सांगली जिल्ह्याच्या खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज व जत या तालुक्यातून वाहते. हा भाग अवर्षणग्रस्त असून, प्रत्येक 3-4 वर्षांमध्ये येथे टंचाईची परीस्थिती उद्भवते.

17 नोव्हेंबर 2015 रोजी तत्कालीन मंत्री (जलसंधारण), राज्यमंत्री (जलसंधारण) व सचिव (जलसंधारण) यांच्यासमोर अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प प्रारूप अहवालाचे सादरीकरण करण्यात आल़े त्यावेळी अग्रणी नदी पुनरुज्जीवन अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये सिमेंट बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली. अग्रणी नदीची एकूण लांबी 60 किलोमीटर आहे. त्यापैकी 48 किलोमीटर लांबीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्यापैकी खानापूर तालुक्यातील 20, तासगाव तालुक्यातील 12 व कवठेमहांकाळ तालुक्यातील 16 किलोमीटर लांबीचे पुनरुज्जीवन करण्यात आले.

जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग (लघुसिंचन) विभागामार्फत 24 सिमेंट बंधारे बांधण्यात आले. जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद विभागामार्फत 10 सिमेंट बंधारे बांधण्यात आले. वनविभागामार्फत 262.5 हेक्टरवर सलग समतल चर करण्यात आले व 559 हेक्टरवर 28 मातीचे सलग समतल बांध व 223 शेततळी बांधण्यात आली आहेत. या कामांमध्ये जलबिरादरी ही अशासकीय संस्था तसेच लोकसहभागाचाही मोठा वाटा आहे.

1500 विहिरी, कूपनलिकांची भूजल पातळी वाढली
अग्रणी नदी पुनरुज्जीवनामुळे जमिनीच्या सुपिकतेमध्ये वाढ झाली आहे. अंदाजित 1500 विहिरी व कूपनलिकेच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे. अग्रणी नदी पुनरुज्जीवन अंतर्गत अग्रणी नदीच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण करण्यात आले आहे. 6 हजार आंब्यांची झाडे जलबिरादरी या संस्थेमार्फत लावण्यात आली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाकडून 32 हजार झाडे लावण्यात आली आहेत. वन विभागाकडून 2 हजार 14 हेक्टर व कृषी विभागाकडून 3 हजार 119 हेक्टर क्षेत्रामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. या कामांमुळे नदीपात्रामधील जमिनीची धूप कमी झाली आहे.