
पदवी घेण्यासाठी आता पाच वर्षे वेळ देण्याची गरज लागणार नाही. दहावीनंतर अवघ्या चार वर्षांत पदवी मिळवता येणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणात त्या दृष्टीने बदल करण्यात आले असून फेब्रुवारी महिन्यात यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार आहेत.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशनच्या वतीने (सीईडीए) बीएमसीसी कॉलेजमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करताना शिक्षणाची आवड लक्षात घेण्यात आली आहे. आवडीच्या विषयांचा समावेश करून छोटे-छोटे अभ्यासक्रम आखण्यात आले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सक्षम आणि कुशल कसे बनवता येईल याचाही बारकाईने विचार करण्यात आला आहे, असे कुलकर्णी म्हणाले.
‘नव्या धोरणातील अनेक गोष्टी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आल्या. त्यातील काही गोष्टी यशस्वी झाल्या. काहींमधील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. हे धोरण अधिक सुलभ करण्यात आले आहे. लवकरच पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा होईल. त्यावर काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
एकाच वेळी अनेक अभ्यासक्रम
नव्या धोरणात एकाच वेळी अनेक अभ्यासक्रम शिकण्यास मुभा देण्याची तरतूद आहे. अशी मुभा देण्यास महाविद्यालये अनुकूल नव्हती. मात्र हळूहळू महाविद्यालयांना याचे महत्त्व पटू लागले आहे. सायन्स, कॉमर्स, आर्ट्ससोबत इंजिनीअरिंगला प्रवेश देण्यासही महाविद्यालये तयार झाली आहेत, असे कुलकर्णी म्हणाले.



























































