नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस

नॅशनल हेराल्ड प्रकरणाची आज दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. शुक्रवारी न्यायालयाने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्यासह पाच जणांना नोटीस बजावली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने आरोपपत्र स्वीकारावे की, नाही हे ठरवण्यासाठी ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतरांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर राऊस अव्हेन्यू न्यायालय समन्स जारी करण्याबाबत निर्णय घेईल. आरोपपत्राची दखल घेण्यापूर्वी आरोपींचा सुनावणीचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही, असे राऊस अव्हेन्यू न्यायालयाने म्हटले आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिताच्या (BNSS) कलम 223 अंतर्गत हा अधिकार देण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 8 मे रोजी होणार आहे.