National Herald Case – दिल्लीतील कोर्टाचा ED ला झटका, आरोपपत्र फेटाळले; सोनिया गांधी आणि राहुल गांधींना मोठा दिलासा

नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीतील राउज एव्हेन्यू कोर्टाने ईडीला मोठा झटका दिला आहे. या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ईडी आपला तपास सुरू ठेवू शकते, असे कोर्टाने म्हटले आहे.

कोर्टाचा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हे प्रकरण पूर्णपणे पोकळ आहे आणि तरीही ते एवढ्या वरपर्यंत नेण्यात आले. आणि आज त्याची साधी कोर्टाने दखलही घेतली नाही. दखल म्हणजे सर्वात खालचा एक छोटासा मुद्दा आहे. यावरून स्पष्ट होते की किती अतिशयोक्ती झाली आहे. सत्ताधारी भाजप या प्रकरणी मोठ्या बाता मारतो. हे इतके अजब प्रकरण आहे जिथे पैशांचा कुठलीही व्यवहार झालेला नाही. जी मालमत्ता आहे ती जैसे थे आहे. मग मनी लाँड्रिंग कशी झाली? कोर्ट साधी दखलही घेत नाही म्हणजे ही तथ्यहीन केस आहे, असे कोर्टाच्या निर्णयानंतर ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस नेत्यांवर मोठे आरोप केले आहेत. असोसिएडेट जर्नल्स लि. (AJL) च्या २००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कब्जा करण्यासाठी खासगी कंपनी ‘यंग इंडियन’च्या माध्यमातून ५० लाख रुपयांत सौदा केला. या कंपनीचे ७६ टक्के शेअर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे आहेत, असा आरोप ईडीने केला होता. या प्रकरणात ९८८ कोटी रुपये गैरव्यवहारातून मिळवल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित मालमत्तांचे बाजार मूल्य हे ५००० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

कशी झाली ईडीची कारवाई?

१२ एप्रिल २०२५ रोजी तपासादरम्यान टाच आणलेल्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ईडीने दिल्लीतील हेराल्ड हाऊस (५ए, बहादूर शाह जफर मार्ग), मुंबईतील वांद्रे (पूर्व) आणि लखनऊमधील विश्वेश्वर नाथ रोड येथील AJLच्या इमारतींवर नोटिसा चिकटवल्या होत्या. ६६१ कोटी रुपयांच्या या स्थावर मालमत्तेव्यतिरिक्त गुन्ह्यातील रक्कम सुरक्षित करण्यासाठी आणि आरोपींना ती रद्द करण्यापासून रोखण्यासाठी ईडीने नोव्हेंबर २०२३ मध्ये AJLचे ९०.२ कोटी रुपयांचे शेअर्स जप्त केले होते.

काय आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राशी संबंधित असलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १९३८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ५,००० स्वातंत्र्यसैनिकांसह या वृत्तपत्राची सुरुवात केली होती. हे वृत्तपत्र AJL द्वारे प्रकाशित केले जात होते. २००८ मध्ये ते बंद झाले. त्यानंतर त्याच्या अधिग्रहणावरून वाद सुरू झाला.