उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करा!

यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेची लाट येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह 11 राज्यांना त्याची झळ पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांतील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, बेघर, वृद्ध, लहान मुले आणि उघडय़ावर काम करणाऱया कामगारांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करा असे निर्देश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले आहेत.

2018 ते 2022 या कालावधीत कडक ऊन आणि उष्माघातामुळे देशभरात 3798 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यावेळी सावध रहा आणि उष्मा नागरिकांच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी घ्या असे आयोगाने या 11 राज्यांना निर्देश दिले आहेत. त्यासंदर्भात आयोगाने या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या त्याचा अहवाल सादर करण्यासही आयोगाने सांगितले आहे.

या राज्यांचा समावेश

महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान

आयोगाने दिलेले निर्देश

  • उष्म्याशी संबंधित आजारांवर उपचारांची व्यवस्था करा
  • सार्वजनिक ठिकाणी पंखे वाढवा
  • कामगारांसाठी संरक्षक कपडे आणि विश्रांतीच्या सुविधा उपलब्ध करून द्या
  • वसाहती आणि कामगार वस्त्यांमधील कुटुंबांना पंखे, थंड छताचे साहित्य आणि ओआरएसची पाकिटे द्या