बदल्या, मोबिलिटी धोरणाविरोधात भारतीय विमा कर्मचारी सेनेची कोलकात्याला धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल इन्शुरन्स कंपनीमधील कर्मचाऱयांच्या होणार्‍या बदल्या आणि मोबिलिटी पॉलिसी (टीएमपी) विरोधात शिवसेनेच्या भारतीय विमा कर्मचारी सेनेने थेट कोलकात्यातील मुख्यालयाला धडक दिली. त्यामुळे नरमलेल्या प्रशासनाने शिवसेना शिष्टमंडळाला बदल्यांच्या नियमात बदल करण्याचे आश्वासन दिले.

नॅशनल इन्शुरन्स कंपनीमधील कर्मचाऱयांवर बदल्या आणि मोबिलिटी पॉलिसीच्या (टीएमपी) माध्यमातून अन्याय सुरू आहे. कंपनीच्या या धोरणामुळे कंपनीवर आर्थिक ताण तर येतोच पण त्यामुळे कर्मचाऱयांच्या कामावर परिणाम होतो. याविरोधात खासदार आणि शिवसेना सचिव अनिल देसाई, भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस मनोहर गायखे, न्यू इंडिया इन्शुरन्स स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, कार्यकारी चिटणीस संजय डफळ, परेश विचारे, सचिव संजय पारकर यांच्या शिष्टमंडळाने विमा कर्मचाऱयांच्या प्रमुख मागण्यांसह कोलकाता येथील नॅशनल इन्शुरन्सच्या मुख्यालयाला धडक दिली.

नॅशनल इन्शुरन्सच्या अध्यक्षा आणि संचालिका तजिंदर मुखर्जी, कंपनीचे महाव्यवस्थापक आणि संचालक जॉन पुलिंथनम यांची भेट घेऊन कर्मचाऱयांच्या अन्यायाला वाचा फोडली. कर्मचाऱयांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, अन्यथा शिवसेना स्टाइलने शिवसेनाही या आंदोलनात सहभागी होईल, असा इशारा खासदार आणि शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी चर्चेवेळी दिला. यावेळी तजिंदर मुखर्जी यांनी कर्मचाऱयांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, बदली आणि मोबिलिटी धोरण (टीएमपी) कमीत कमी प्रमाणात राबवू, असे आश्वासन दिले.