
सामना ऑनलाईन, मुंबई
जालना येथे सध्या महाराष्ट्र केसरीचा थरार तमाम कुस्तीप्रेमींना पाहायला मिळत असतानाच पुण्यात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. हिंद केसरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या लढती मातीवर खेळवण्यात येणार आहेत. जागतिक कुस्ती संघटनेने पारंपरिक कुस्तीला ऑलिम्पिकमध्ये नेण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून याच अंतर्गत आता हिंदुस्थानात लाल मातीवरील कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मॅट व माती या दोन्हीमध्ये ऑलिम्पिक कुस्त्या झाल्या तर हिंदुस्थानला पदकांची लयलूट करता येईल असे म्हटले तरी यावेळी वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्राच्या मराठमोळ्या खाशाबा जाधव यांनी 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकून इतिहास रचला होता. त्यांनी लाल मातीवरील संस्मरणीय कामगिरी करून देशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकवला होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ऑलिम्पिकमध्ये मॅटवरील कुस्तीचाच खेळ रंगू लागला. यामध्ये हिंदुस्थानी खेळाडूंची पीछेहाट झाली. सुशील कुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक या हिंदुस्थानच्या पठ्ठय़ांनी ऑलिम्पिक पदक जिंकून हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली. पण आगामी ऑलिम्पिकमध्ये मॅटसोबतच मातीवरील कुस्तीच्या लढती रंगल्या तर हिंदुस्थानला याचा फायदा नक्कीच होईल यात वाद नाही.
‘महाराष्ट्र केसरी’मधून संघ निवडला जाईल
पुण्यात 28 ते 30 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशभरातून विविध संघ सज्ज होत आहेत. यामध्ये सेनादल, रेल्वे यांसारख्या संघांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा संघही यामध्ये उतरणार आहे. सध्या जालना येथे सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येईल अशी माहिती बाळासाहेब लांडगे यांनी यावेळी दिली.
पारंपरिक खेळाला प्राधान्य
जागतिक कुस्ती संघटना पारंपरिक कुस्तीला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 2017 सालापासून ही सुरुवात झालीय. पुढच्या ऑलिम्पिकमध्ये मातीतल्या कुस्तीचा समावेश होईल की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही पण जगभरात मातीतील कुस्ती खेळायला हवी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत असे कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी दैनिक ‘सामना’ला सांगितले.



























































