नॅशनल लायब्ररीचा अमृत महोत्सवानिमित्त ‘मनमग्न मुक्ता’

नॅशनल लायब्ररी यांच्या वांद्रे पश्चिम येथील ऐतिहासिक वास्तूच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितांवर आधारित मनमग्न मुक्ता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी, 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता, नॅशनल लायब्ररी, स्वामी विवेकानंद रोड, वांद्रे पश्चिम येथे हा कार्यक्रम होणार आहे.

नॅशनल लायब्ररीच्या वास्तूचे उद्घाटन 26 मार्च 1950 रोजी मुंबईचे तत्कालीन राज्यपाल राजा महाराज सिंग यांच्या हस्ते झाले. या वास्तूला आता 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखिका रेखा भांडारे यांची असून दिग्दर्शन निसर्ग देहूकर यांचे आहे. इंदिरा संत यांच्या काही आठवणी, न ऐकलेले किस्से आणि रेखाताईंशी अनेक वर्षे झालेल्या विलक्षण पत्रसंवादातून उलगडत जाणाऱ्या इंदिराबाई या कार्यक्रमातून रसिकांच्या भेटीला येतील.

या कार्यक्रमात शुभांगी पासेबंद, निसर्ग देहूकर यांचाही सहभाग असणार आहे. तसेच गायिका देवकी पंडित यांनी चाल दिलेल्या इंदिराबाईंच्या काही रचनाही रसिकांना ऐकायला मिळतील. हा कार्यक्रम विनामूल्य आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.