अमेरिकेला जाणाऱ्या विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, तेलंगणातील विमानतळावर घबराटीचे वातावरण

तेलंगणातील शमशाबाद विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्बच्या धमकीचा मेल आल्याने एकच गोंधळ उडाला. विमानतळ अधिकाऱ्यांना एक संशयास्पद ईमेल प्राप्त झाला. अमेरिकेला जाणाऱ्या विमानांमध्ये बॉम्ब ठेवले असून उड्डाणानंतर 10 मिनिटांनी स्फोट होतील, असा दावा ईमेलमध्ये करण्यात आला आहे.

धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर टर्मिनल, धावपट्टी, एअरसाइड झोन आणि विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली. सीआयएसएफ, राज्य पोलीस आणि इतर सुरक्षा युनिट्स संभाव्य धोक्यांची चौकशी करत आहेत.

तपासादरम्यान हा ईमेल अमेरिकेतील न्यू यॉर्क येथून जॅस्पर पार्कार्ट नावाच्या व्यक्तीच्या आयडीवरून आल्याचे समोर आलं आहे. ईमेल करणाऱ्याने दहा लाख डॉलर्सची मागणी केली आहे. ही रक्कम दिल्यास बॉम्बस्फोट करणार नाही अशी धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या. विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अधिकारी ईमेलची सत्यता, आयपी ट्रॅकिंग आणि पाठवणाऱ्याचे लोकेशन तपासत आहेत.