
आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाब सरकारच्या ड्रग्जमुक्त मोहिमेचे समन्वयक दलजीत राजू दरवेश यांच्या घरावर बुधवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी त्यांच्यावर सुमारे 25 राउंड फायर करत 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारे पत्र फेकून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दलजीत राजू दरवेश यांच्या पंजाबमधील फगवाडा येथील निवासस्थानी ही घटना घडली. रात्री उशिरा हल्लेखोरांनी घराच्या भिंती आणि दरवाज्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारात खिडक्यांच्या काचा पूर्णपणे तुटल्या. गोळीबारानंतर, दोन्ही हल्लेखोर धमकीचे पत्र फेकून घटनास्थळावरून पळून गेले. पत्रात दलजीत राजू यांच्याकडे 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.
दलजित राजू यांच्या तक्रारीवरून सदर पोलिस स्टेशनचे एसएचओ कृपाल सिंग पथकासह घटनास्थळी पोहोचले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे आणि गुंडांच्या लपण्याच्या शक्य ठिकाणांवर छापे टाकत आहेत.




























































